सुदैवी अ‍ॅलिस्टर कुक आणि गॅरी बॅलन्स यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या धावांचा बॅलन्स वाढता वाढता वाढतच गेला. कुकचे शतक फक्त पाच धावांनी हुकले असले तरी ती कमतरता बॅलन्सने भरून काढली. या दोघांच्या झुंजार खेळींच्या जोरावर पहिल्या दिवसअखेर इंग्लंडला २ बाद २४७ अशी मजल मारता आली.
इंग्लंडने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आणि कुक १४ धावांवर असताना त्याचा पदार्पण करणाऱ्या पंकज सिंगच्या गोलंदाजीवर तिसऱ्या स्लीपमध्ये रवींद्र जडेजाने सोपा झेल सोडला. या जीवदानाचा फायदा उचलत कुकने चांगली फलंदाजी केली, पण शतकाची वेस मात्र त्याला ओलांडता आली नाही. कुकने बॅलन्सच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी १५८ धावांची भागीदारी रचली, तर त्याने ९ चौकारांच्या जोरावर ९५ धावांची खेळी साकारली. बॅलन्सने १५ चौकारांच्या जोरावर नाबाद १०४ धावांची खेळी साकारली. भारताकडून मोहम्मद शमी आणि जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.