28 May 2016

सारेच ‘गंभीर’!

बराच काळ अपयशाशी लढाई केल्यानंतर भारतीय कसोटी संघातून वगळण्यात आलेला सलामीवीर गौतम गंभीर पुनरागमनासाठी

पीटीआय, चेन्नई | February 16, 2013 5:04 AM

बराच काळ अपयशाशी लढाई केल्यानंतर भारतीय कसोटी संघातून वगळण्यात आलेला सलामीवीर गौतम गंभीर पुनरागमनासाठी आसुसला आहे. शनिवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन दिवसीय सराव सामन्यात भारतीय ‘अ’ संघाचे नेतृत्व करताना गंभीरच्या फलंदाजीचाही कस लागणार आहे.
दिल्लीचा डावखुरा सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरला गेली तीन वष्रे कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. याचप्रमाणे धावांसाठी तो सातत्याने झगडताना आढळला. त्यामुळे २२ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ निवडताना त्याला डच्चू देण्यात आला. भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व आधी शिखर धवनकडे सोपविण्यात आले होते. परंतु गंभीरऐवजी भारताच्या संघात धवनने स्थान मिळविल्यामुळे भारत ‘अ’ संघाचे कर्णधारपद गंभीरकडे दिले गेले.
अध्यक्षीय संघाविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाची कामगिरी फारशी वाईट झाली नाही. हा सामना अनिर्णीत अवस्थेत संपला. परंतु त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या फक्त ११ खेळाडूंचाच पहिला चमू भारतात दाखल झाला होता. पण आता दुसऱ्या सराव सामन्यात कप्तान मायकेल क्लार्कसह ऑसी संघ पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारतीय वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न त्या सराव सामन्यात केला.
भारतीय ‘अ’ संघाच्या फलंदाजीची मदार असेल ती रोहित शर्मा, मनोज तिवारी आणि अजिंक्य रहाणे यांच्यावर. यावेळी जीवनज्योत सिंग हा नवा चेहराही दिसणार आहे. यंदाच्या रणजी हंगामात त्याने १० सामन्यांत सर्वाधिक ९९५ धावा काढल्या आहेत. त्यामुळेच राष्ट्रीय स्तरावर चमकलेला हा तारा आंतरराष्ट्रीय प्रतिस्पध्र्यासमोर कशी कामगिरी बजावतो, याविषयी सारे उत्सुक आहेत. रणजी हंगामात दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक ९६६ धावा काढणारा मुंबईचा अभिषेक नायर याच्या कामगिरीकडेही निवड समितीचे लक्ष असेल.
दुसरीकडे दुखापतीतून सावरलेला क्लार्क कसोटी सामन्यात खेळण्यापूर्वी सराव सामन्यात स्वत:ला नक्कीच आजमावेल, अशी चिन्हे आहेत. याचप्रमाणे आता फक्त फलंदाजीकडे लक्ष केंद्रित करणारा अष्टपैलू शेन वॉटसनसुद्धा या सराव सामन्याकडे गांभीर्याने पाहात आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत ‘अ’ : गौतम गंभीर (कर्णधार), जीवनज्योत सिंग, रोहित शर्मा, मनोज तिवारी, अजिंक्य रहाणे, सी. गौतम, राकेश ध्रुव, जलाज सक्सेना, मनप्रीत गोनी, विनय कुमार, धवल कुलकर्णी, अशोक मनेरिया, अभिषेक नायर.
ऑस्ट्रेलिया : मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ईडी कोवान, फिलिप ह्युजेस, शेन वॉटसन, उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू व्ॉड (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मोझेस हेन्रिक्स, मिचेल जॉन्सन, जेम्स पॅटिन्सन, मिचेल स्टार्क, पीटर सिडल, जॅक्सन बर्ड, झेव्हियर डोहर्टी, नॅथन लिऑन.

First Published on February 16, 2013 5:04 am

Web Title: all are serious
टॅग Cricket,Sports