नागपूर तालुका बुद्धिबळ संघटना आणि नागपूर जिल्हा बुध्दिबळ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १४ नोव्हेंबरपासून नागपुरात अखिल भारतीय बुद्धीबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत भारतातील अव्वल दर्जाचे बुद्धिबळपटू सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र बुद्भिबळ संघटनेचे सचिव दिलीप पागे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रेशीमबागेतील हेडगेवार स्मारक समितीच्या सभागृहात होणाऱ्या या स्पर्धेत तामीळनाडूचा विनय कुमार, महाराष्ट्राचा सौरभ खेर्डेकर, रामक्रिष्णा या मानांिंकत खेळाडूंनी सहभाग निश्चित केला आहे. त्याचबरोबर नागपूरचेही अनेक उदयोन्मुख बुद्धिबळपटू यात सहभागी होतील. स्पर्धेत आतापर्यंत १२० स्पर्धकांनी नावे नोंदविली आहेत.
चार दिवसांच्या या स्पर्धेत एकूण १ लाख ६६ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. विजेत्याला ३५ हजार रोख, उप विजेत्याला २१ हजार, तिसऱ्या स्थानावरील स्पर्धकाला १५ हजार रुपये रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मुले व मुलींच्या गटात १२,१२, ९ आणि ७ वर्षांखालील गटातील बुध्दिबळपटूंना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. शाळांपैकी दोन सर्वोत्तम संघांनाही पारितोषिके प्रदान करण्यात येतील.
या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ कॉलेज अ‍ॅण्ड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेन्टचे संचालक डॉ. डी.के. अग्रवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. पत्रकार परिषदेला नगपूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव के.के. वरात, सुशींत जुमडे, व्ही.के. श्रीवास्तव उपस्थित होते.