राष्ट्रकुल विजेत्या पारुपल्ली कश्यप आणि एच. एस. प्रणॉयने अमेरिकन खुल्या ग्रँड प्रिक्स गोल्ड बॅडमिंटन स्पध्रेची उपांत्य फेरी गाठली आहे.

दुखापतीतून सावरून दमदार पुनरागमन करणाऱ्या कश्यपने भारतीय सहकारी समीर वर्माचा ४० मिनिटांत २१-१३, २१-१६ असा सहज पाडाव केला आणि सात महिन्यांत प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पध्रेची उपांत्य फेरी गाठली. त्याची कोरियाच्या क्वांग ही हीओशी लढत होणार आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात कश्यपने कोरियन खुल्या बॅडमिंटन स्पध्रेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले होते.

प्रणॉयने यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या इंडोनेशिया सुपर सीरिज प्रीमियर बॅडमिंटन स्पध्रेत तो अंतिम चौघांमध्ये पोहोचला होता.

द्वितीय मानांकित प्रणॉयने जपानच्या कँटा त्सुने यामाचा १०-२१, २१-१५, २१-१८ असा पराभव केला. प्रणॉयची उपांत्य फेरीत टीएन मिन्ह नग्युएनशी (व्हिएटनाम) गाठ पडणार आहे.

पुरुष दुहेरीत तिसऱ्या मानांकित मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी जोडीने जपानच्या हिरोकी ओकामुरा आणि मासायुकी ओनोडेराचा २१-१८, २२-२० असा पराभव केला.

दोन्ही विभागांत भारताचे प्रत्येकी चार खेळाडू

क्वालालम्पूर : ग्लासगो येथे २१ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेसाठी पुरुष व महिला या दोन्ही विभागांतील एकेरीच्या लढतींकरिता प्रत्येकी चार प्रवेशिका पाठवण्याची संधी भारताला मिळाली आहे. महिलांमध्ये ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही.सिंधू व कांस्यपदक विजेती सायना नेहवाल यांच्याबरोबरच राष्ट्रीय विजेती रितुपर्णा दास व तन्वी लाड यांनाही या स्पर्धेत प्रवेश मिळाला आहे. महिलांच्या एकेरीत चार प्रवेशिका पाठवण्याचा मान फक्त चीन, जपान व भारताला मिळाला आहे.

पुरुषांच्या एकेरीत सय्यद मोदी चषक विजेता समीर वर्माबरोबरच अजय जयराम, किदम्बी श्रीकांत व बी. साईप्रणीत हे भारताचे आव्हान पेलणार आहेत. गतविजेता चेन लाँग, पाच वेळा विजेता लिन डॅन, शेई युगी व तियान होउवेई (चीन), अँडर्स अन्तोन्सन, व्हिक्टर अ‍ॅक्सेलसन, जान ओ जोर्गेन्सन, हान्स क्रिस्तियन सोलबर्ग (डेन्मार्क), निग कालोंग हे विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहेत.