एटीपीसारखी महत्त्वाची टेनिस स्पर्धा येथून पुण्यात घेण्याच्या निर्णयाबद्दल आनंद व विजय अमृतराज या बंधूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या बंधूंमुळेच ही स्पर्धा आयोजित करण्याचा पहिला मान १९९७ मध्ये चेन्नई शहरास मिळाला. त्यानंतर अव्याहतपणे ही स्पर्धा येथे होत आहे.

विजय यांनी सांगितले, या स्पर्धेद्वारेच भारतास लिअँडर पेस व महेश भूपती यांच्यासारखी अव्वल दर्जाची जोडी मिळाली. ही स्पर्धा भारतात घेण्यासाठी आम्हाला खूप मेहनत करावी लागली होती. एटीपीच्या संघटकांकडे अनेक वेळा विनवण्या कराव्या लागल्या होत्या. गेली २० वर्षे सातत्याने यशस्वीरीत्या आयोजित करण्यात येत असलेली ही स्पर्धा येथे होणार नाही याचे दु:ख आमच्याबरोबरच येथील टेनिस चाहत्यांना मोठय़ा प्रमाणावर जाणवणार आहे. अर्थात, ही स्पर्धा आपल्या देशातच राहणार आहे याचेच समाधान आहे.

आनंद म्हणाले, ही स्पर्धा येथून दुसरीकडे जाणार आहे. ही क्लेशदायक व लाजिरवाणी गोष्ट आहे. येथील चाहत्यांबरोबरच उदयोन्मुख खेळाडूंचेही नुकसान होणार आहे. अनेक नवोदित खेळाडूंना या स्पर्धेद्वारे जगातील नामांकित खेळाडूंचे कौशल्य पाहण्याची संधी मिळत असते. ही संधी त्यांना आता मिळणार नाही याचेच दु:ख मला आहे. अर्थात, पुणे शहर हेदेखील टेनिसकरिता खूप चांगले ठिकाण आहे. तेथे नुकतेच डेव्हिस चषक सामन्याचे अतिशय चांगल्या रीतीने आयोजन करण्यात आले होते. फक्त पुण्यात थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध नाही.

आनंद यांनी सांगितले, या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकेरीत चांगली कामगिरी केली पाहिजे. एकेरी व दुहेरीच्या सामन्यांकरिता स्वतंत्र कौशल्य आवश्यक असते. युकी भांब्री व रामकुमार रामनाथन यांच्याकडून मला मोठय़ा अपेक्षा आहेत.

भारताची डेव्हिस चषक लढतीत कॅनडाशी गाठ पडणार असून ही लढत एडमंटन येथे होणार आहे. त्या बाबत आनंद म्हणाले, मिलोस राओनिक हा कॅनडाचा महत्त्वाचा खेळाडू आहे, मात्र तो या लढतीत भाग घेण्याची शक्यता कमी आहे. तो खेळला नाही तर भारतास विजय मिळविण्याची संधी आहे.