जगज्जेत्या विश्वनाथन आनंदला ग्रेन्क क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल मानांकन मिळाले असून जेतेपदासाठी आनंदचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. पहिल्या फेरीत आनंदचा मुकाबला इंग्लंडच्या मायकेल अ‍ॅडम्सशी होणार आहे. टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागल्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर आनंद क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. सहा खेळाडूंच्या या स्पर्धेत इटलीच्या फॅबियानो कारुआना याला दुसरे मानांकन मिळाले आहे. अ‍ॅडम्ससह अर्कादिस्च नैदिस्च, डॅनियल फ्रिडमन आणि जॉर्ज मेयर हे जर्मनीचे तीन बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. क्लासिकल बुद्धिबळाच्या नियमांनुसार ही स्पर्धा होणार असून पहिल्या ४० चालींसाठी १०० मिनिटे, त्यानंतरच्या २० चालींसाठी ५० मिनिटे तसेच पुढच्या प्रत्येक चालीसाठी ३० सेकंदांचा कालावधी वाढवून दिला जाईल. ४० चालींआधी सामना बरोबरीत सोडवण्याची परवानगी दिली जाणार नाही.