रशियाचा ग्रँडमास्टर ग्रिगोरी ओपरीनने माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदला बरोबरीत रोखले आणि जिब्राल्टर बुद्धिबळ स्पर्धेत अनपेक्षित धक्का दिला. या बरोबरीमुळे आनंदचे चौथ्या फेरीअखेर तीन गुण झाले आहेत.

सिसिलीयन नॉजदार्फ तंत्राचा उपयोग करीत आनंदने जोखीम न पत्करता बचावात्मक तंत्रावर भर दिला. ओपरीननेही आनंदसारख्या बलाढय़ खेळाडूविरुद्ध धोका पत्करण्याचे टाळले. दोन्ही खेळाडूंनी ३१व्या चालीस बरोबरीचा प्रस्ताव मान्य केला. भारताच्या द्रोणावली हरिकाने हंगेरीच्या रिचर्ड रॅपोर्टविरुद्धचा डाव बरोबरीत सोडविला. एस. पी. सेतुरामनने फ्रान्सच्या मॅक्झिम व्हॅचिअर लाग्रेव्हला बरोबरीत रोखून अनपेक्षित निकाल नोंदविला. पी. हरिकृष्ण याने ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरमवर सहज मात केली.