माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने सिंक्वेफिल्ड चषक बुद्धिबळ स्पध्रेच्या चौथ्या फेरीत अमेरिकेच्या फॅबिआनो कारुआनाला बरोबरीत रोखले. चौथ्या सामन्यापैकी तिसऱ्यांदा काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना आनंदला सलग दुसरा सामना बरोबरीत सोडवण्यात यश आले.
पहिले दोन सामने गमावणाऱ्या आनंदने पराभवाची भीती न बाळगता आत्मविश्वासाने खेळ केला. तीन लाख अमेरिकन डॉलर्स पारितोषिक रकमेच्या या स्पध्रेत आनंदने तिसऱ्या फेरीत बल्गेरियाच्या व्हेसेलिन तोपालोव्हला बरोबरीत रोखून पुनरागमन केले. आनंदने सेमी स्लाव्ह बचावपद्धतीचा वापर केला, तरी कारुआनाने सामन्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
दहा खेळाडूंचा समावेश असलेल्या आणि राऊंड रॉबिन पद्धतीने चालणाऱ्या या स्पध्रेत अर्मेनियाचा ग्रँडमास्टर लेव्हॉन अरोनियमने धक्कादायक विजयाची नोंद केली. त्याने अमेरिकेच्या वेस्ली सो याला पराभूत केले. विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने हॉलंडच्या अनिश गिरीला बरोबरीत रोखले. तसेच अ‍ॅलेक्झांडर ग्रिश्चूक आणि तोपालोव्ह यांच्यातील लढत बरोबरीत सुटली.
या स्पध्रेच्या अद्याप सहा फेऱ्या बाकी असून, अरोनियम आणि तोपालोव्ह प्रत्येकी तीन गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. गिरी आणि कार्लसन प्रत्येकी अडीच गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. नाकामुरा आणि व्हॅचिअर-लॅग्राव्ह प्रत्येकी दोन गुणांसह पाचव्या स्थानावर आहेत.