भारताचा बॅडमिंटनपटू आनंद पवारने तैपाईच्या हसुआन यि शुहचा सरळ गेममध्ये पराभव करीत जर्मन खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पध्रेच्या पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. जर्मनीच्या मल्हैम अन डर रुह या ठिकाणी चालू असलेल्या या स्पध्रेत जागतिक क्रमवारीत ५१व्या स्थानावर असलेल्या आनंदने शुहचा २१-१५, २१-१३ असा फक्त २९ मिनिटांत पराभव केला.
द्वितीय मानांकित बूनसॅक पोन्साना (थायलंड) आणि १६वा मानांकित निलुका करुणारत्ने (श्रीलंका) यांच्यातील विजेत्याशी आता आनंदची गाठ पडणार आहे. अनुभवी खेळाडू अरविंद भडचे आव्हान संपुष्टात आले आहे. पोन्सानाकडून त्याने १०-२१, १६-२१ अशा फरकाने पराभव पत्करला.
पुरुष दुहेरीत तरुण कोना आणि अरुण विष्णू यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. १६-२१, १७-२१ अशा फरकाने त्यांनी व्ही. शेम गोह आणि खिम वाह लिम यांच्याकडून पराभव पत्करला.