माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने सिंक्वेफिल्ड चषक बुद्धिबळ स्पध्रेत सहाव्या फेरीत नेदरलँड्सच्या अनिश गिरीला बरोबरीत रोखले.
या महत्त्वाच्या स्पध्रेतील तीन फेऱ्या बाकी असून, आनंदने संयुक्तपणे नवव्या स्थानावरून आठव्या स्थानावर आगेकूच केली आहे. रविवारी अमेरिकेच्या हिकारू नाकामुराने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करताना वेस्ली सोला पराभूत केले. फ्रान्सच्या मॅक्झिमे व्हॅचिअर-लॅग्रेव्हनेही मुसंडी मारताना बल्गेरियाच्या व्हेसेलिन टोपालोव्हला पराभवाचा धक्का दिला. रशियाच्या अ‍ॅलेक्झांडर ग्रिश्चूकनेही अमेरिकेच्या फॅबिआनो कारूआनाला हरवले. विश्वविजेता मॅग्नस कार्लसन (नॉर्वे) आणि लेव्हॉन अरोनियम (अर्मेनिया) यांनी बरोबरीत समाधान मानून प्रत्येकी चार गुणांसह संयुक्तपणे अव्वल स्थान राखले आहे. तर व्हॅचिअर-लॅग्रेव्ह, गिरी आणि नाकामुरा यांनी प्रत्येकी साडेतीन गुणांसह संयुक्तपणे तिसरे स्थान मिळवले आहे. तोपालोव्ह आणि ग्रिश्चूक प्रत्येकी तीन गुणांसह संयुक्तपणे सहाव्या स्थानावर आहेत.