भारताचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद याने ग्रेन्के क्लासिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकून या वर्षांतील पहिले अजिंक्यपद पटकाविले. त्याने शेवटच्या फेरीत जर्मन खेळाडू अर्कादिज नैदितिश याच्यावर आकर्षक विजय मिळविला. या स्पर्धेतील विजेतेपदासाठी आनंद व इटलीचा फॅबिआनो कारुआना यांच्यात विलक्षण चुरस होती. शेवटच्या फेरीपूर्वी दोन्ही खेळाडूंचे प्रत्येकी साडेपाच गुण होते. विजेतेपदासाठी दोन्ही खेळाडूंना एक गुणाची आवश्यकता होती. आनंदने शेवटच्या फेरीत एक गुण वसूल करीत आपली गुणसंख्या साडेसहा केली.
 कारुआना याला मात्र जर्मनीच्या डॅनियल फ्रिडमन याच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली. कारुआना याला सहा गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मायकेल अ‍ॅडम्स व जॉर्ज मेईर यांनी शेवटच्या फेरीत डाव बरोबरीत सोडविला आणि संयुक्तपणे तिसरे स्थान मिळविले. त्यांचे प्रत्येकी पाच गुण झाले.
जागतिक विजेतेपदाची लढत जिंकल्यानंतर आनंदची आंतरराष्ट्रीय स्तरावर अपेक्षेइतकी कामगिरी झाली नव्हती. त्यामुळेच येथे तो विजेतेपदासाठी उत्सुक झाला होता. आनंदने नैदितिशविरुद्ध सिसिलीयन डिफेन्सचा उपयोग केला.
चांगली व्यूहरचना मिळविण्यासाठी आनंदने डावाच्या सुरुवातीस एका प्यादाचा बळी दिला.
१४ व्या चालीस नैदितिशने आक्रमणास सुरुवात केली. मात्र त्यामध्ये त्याचे डावपेच फसले व त्याला दोन प्यादी गमवावी लागली. वजिरावजिरीनंतर नैदितिशला स्वत:च्या चालींवर नियंत्रण ठेवता आले नाही. खरंतर हा डाव बरोबरीत ठेवणे त्याला शक्य होते. मात्र संभ्रमात पडलेल्या नैदितिशचा बचाव आनंदच्या अनुभवी चालींपुढे निष्प्रभ ठरला. ४९ व्या चालीस नैदितिशने पराभव मान्य केला.
डाव जिंकल्यानंतर आनंद म्हणाला, हे विजेतेपद माझ्यासाठी सुखकारक आहे. गेले काही महिने मी अव्वल यशापासून दूर होतो. बिलबाओ २०११ च्या लढतीनंतर मी उगाचच माझ्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना अर्धा गुण बहाल करीत होतो. नैदितिशविरुद्धच्या लढतीत डावाच्या शेवटी हत्तीच्या साहाय्याने चाली करताना मला थोडीशी काळजी घ्यावी लागली. त्याने केलेल्या अक्षम्य चुकांचा मला फायदा झाला. विज्क अ‍ॅन्झी २०११ स्पर्धेत मी उपविजेता झालो होतो. त्यानंतर मला येथे अपेक्षेप्रमाणे यश मिळाले आहे.
आनंद हा महान खेळाडू – अली यासिकी
आनंद हा केवळ भारतामधील नव्हे तर जगातील महान खेळाडू आहे. आजपर्यंत त्याने पाच विश्वविजेतेपदे मिळविली आहेत. ही विजेतीपदे त्याच्या महानतेस साजेशी आहेत. अतिशय संयमी व शांत वृत्तीचा हा खेळाडू अन्य खेळाडूंसाठी प्रेरणादायक खेळाडू आहे, असे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे उपाध्यक्ष अली निहात यासिकी यांनी पुण्यात सांगितले. आनंद याच्यात आणखीही विश्वविजेतेपद मिळविण्याची क्षमता आहे. ही विजेतीपदे तो मिळविल असा आत्मविश्वासही यासिकी यांनी व्यक्त केला.
स्पर्धेतील पहिल्या फेरीपासून आघाडी मिळविणाऱ्या कारुआना याला फ्रिडमनविरुद्ध विजयाची संधी साधता आली नाही. तब्बल ८८ चालींपर्यंत हा डाव रंगतदार झाला. तरीही फ्रिडमन याचा बचाव मोडून काढण्यात कारुआना अपयशी ठरला.