लंडन क्लासिक बुद्धिबळ

भारताचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद याला विजयाचा मार्ग अखेर सापडला. लागोपाठ १७ सामन्यांमध्ये विजयापासून वंचित राहिलेल्या आनंदने येथील लंडन क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत इंग्लंडचा ग्रँडमास्टर गेवेन जोन्सवर मात केली.
आनंद याला गेले काही महिने विजय मिळविण्यापासून वंचित रहावे लागले होते. शुक्रवारी त्याने झुंजार खेळ करीत जोन्सला पराभूत केले. नॉर्वेच्या मॅग्नुस कार्लसन याने अव्वल दर्जाचा खेळ करीत मायकेल अ‍ॅडम्स याच्यावर मात केली तर व्लादिमीर क्रामनिक याने ल्युक मॅकशेनी याला पराभूत केले. अमेरिकन खेळाडू हिकारू नाकामुरा याने महिला स्पर्धक ज्युडिथ पोल्गार हिच्यावर शानदार विजय मिळविला.
कार्लसन याने तेरा गुणांसह आघाडी राखली आहे. क्रामनिक याने दुसरे स्थान घेतले असून त्याचे अकरा गुण झाले आहेत. नाकामुरा याने आठ गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला आहे. अ‍ॅडम्सचे सात गुण असून आनंदने आतापर्यंत सहा गुण घेतले आहेत.  जोन्सने सॅमिश तंत्राचा उपयोग केला मात्र आनंदने कल्पकतेने खेळ करीत हा डाव त्याच्यावरच उलटविला. केवळ २९ चालींमध्ये त्याने हा डाव जिंकला.