चोर समजून प्रेयसीचा खून केल्याप्रकरणी पिस्टोरियसला अटक
दोन्ही पाय निकामी असूनही फायबरचे ब्लेड लावून लंडन ऑलिम्पिकमध्ये धावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या ऑस्कर पिस्टोरियसच्या जिद्द, चिकाटीबद्दल सर्वानीच तोंड भरून कौतुक केले होते. पण ‘ब्लेड रनर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पिस्टोरियसने ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशीच आपल्या प्रेयसीचा खून करून आपल्या तमाम चाहत्यांना दुखावले आहे. व्यवसायाने मॉडेल असलेल्या आपल्या प्रेयसीची गैरसमजूतीतून हत्त्या केल्याप्रकरणी दक्षिण आफ्रिकेच्या पोलिसांनी पिस्टोरियसला खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे.
प्रीटोरिया येथील आपल्या राहत्या घरी वरच्या मजल्यावर चोर शिरला असल्याचे समजून पिस्टोरियसने त्याला गोळ्या घातल्या. पण तो चोर नव्हे तर ती आपलीच प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्प होती. ३० वर्षीय रिव्हाला गोळ्या घालून ठार मारल्याचा आरोप पिस्टोरियसवर लावण्यात आला आहे, असे लेफ्टनंट कर्नल कॅटलेगो मोगाले यांनी सांगितले.

कसा घडला प्रकार
घरात चोर शिरला असल्याचे समजून पिस्टोरियसने त्याला आपल्या बंदुकीतून चार गोळ्या घातल्या. पण ती आपली प्रेयसी रिव्हा असल्याचे नंतर समोर आले. चार गोळ्या लागल्याने रिव्हाचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी नऊ मिलीमिटरची बंदुक सापडली असून त्यावेळी पिस्टोरियस घरात एकटाच होता, असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.

एक वर्षांपासून होती मैत्री
पिस्टोरियस आणि रिव्हा यांच्यात एक वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. जाहीर कार्यक्रमातही रिव्हा ही पिस्टोरियसचे गुणगान गात असे. पिस्टोरियससोबत व्हॅलेन्टाइन डे साजरा करण्याचेही तिने ठरवले होते.

रागीट स्वभावाचा ऑस्कर
प्रचंड रागीट स्वभावाचा पिस्टोरियस वेगाचाही तितकाच चाहता आहे. चार वर्षांपूर्वी जोहान्सबर्गमधील एका नदीत बोट चालवताना झालेल्या अपघातात पिस्टोरियसच्या दोन बरगडय़ा, जबडा आणि डोळ्याच्या वरच्या भागाला जबर मार बसला होता. त्याने घरात दोन पांढरे वाघ पाळले होते. पण ते मोठे झाल्यानंतर त्याने ते कॅनडामधील एका प्राणीसंग्रहालयाला विकले होते.

ऑस्करची गरुडझेप
सुदृढ खेळाडूंसाठीच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊन त्याने संपूर्ण जगताला आपली दखल घेण्यास भाग पाडले होते. ऑलिम्पिकमध्ये दोन शर्यतींमध्ये धावणारा तो दोन्ही पायाने अपंग असलेला पहिला अ‍ॅथलीट ठरला होता. ४०० मीटर शर्यतीत त्याने उपांत्य फेरीत मजल मारली होती.  त्यानंतर झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत त्याने ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली होती.