जेम्स अँडरसनच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने तिसऱ्या अ‍ॅशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवली. स्विंगला साहाय्यक खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उठवत इंग्लंडच्या गोलंदाजांनी दिमाखदार पुनरागमन केले.
लॉर्ड्स कसोटीत मानहानीकारक पराभवानंतर इंग्लंडचा संघ पुनरागमनासाठी उत्सुक होता. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय पूर्णत: फसला. दुसऱ्याच षटकात जेम्स अँडरसनने धोकादायक वॉर्नरला माघारी धाडले. दोन वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या स्टीव्हन फिनने भरवशाच्या स्टीव्हन स्मिथला तंबूत परतावले. त्यापाठोपाठ कर्णधार मायकेल क्लार्कला त्रिफळाचीत करत फिनने ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडले. अ‍ॅडम व्होग्स आणि मिचेल मार्श यांनाही अँडरसननेच बाद केले. पीटर नेव्हिल २ धावांवर बाद झाला. रॉजर्सने एकाकी झुंज देत ९ चौकारांसह ५२ धावांची खेळी केली. स्टुअर्ट ब्रॉडने रॉजर्सचा अडसर दूर केला. अँडरसनने ४७ धावांत ६ बळी घेतले. ब्रॉड आणि फिनने प्रत्येकी २ बळी घेतले.