इंग्लंडचा जेम्स अँडरसन व भारताचा रवींद्र जडेजा यांच्यात पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या वादाबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नेमलेल्या न्यायआयुक्त गॉर्डन लेविस यांनी निर्णयाच्या सुनावणीसाठी १ ऑगस्ट ही तारीख निश्चित केली आहे.
या दोन्ही खेळाडूंसंदर्भात लंडनमध्ये मंगळवारी प्राथमिक सुनावणी झाली. या सुनावणीच्या वेळी अँडरसनचे प्रतिनिधी, इंग्लंड क्रिकेट मंडळ, आयसीसीची नीतिमूल्य समिती व कायदेशीर समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे प्रतिनिधी व कायदेशीर सल्लागारही उपस्थित होते. त्यानंतर आयसीसीने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘‘आयसीसीच्या नियमावलीनुसार या खेळाडूंच्या वादाबाबत अन्य खेळाडू व सहयोगी यांच्याही साक्षी नोंदविल्या जाणार आहेत. १ ऑगस्ट रोजी लेविस हे अँडरसनची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बाजू ऐकणार आहेत.’’
या प्राथमिक सुनावणीमुळे २७ जुलैपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत खेळण्याचा अँडरसनचा मार्ग मोकळा झाला आहे. जडेजाला त्याने अपशब्द वापरल्याचा व धक्काबुक्की केल्याचा आरोप सिद्ध झाला, तर चौथ्या व पाचव्या कसोटीला त्याला मुकावे लागण्याची शक्यता आहे. आयसीसीच्या नियमानुसार अँडरसनवर दोन कसोटी व आठ एकदिवसीय सामन्यांची त्याच्या बंदी घातली जाऊ शकते.