तब्बल पाच मॅचपॉइंट्स वाचवताना टॉमी रॉब्रेडोवर मात करत अँडी मरेने व्हॅलेन्सिआ खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली. मरेने ही लढत ३-६, ७-६ (९-७), ७-६ (१०-८) अशी जिंकली. गेल्या महिन्यात शेन्झान येथे झालेल्या स्पर्धेच्या अंतिम लढतीतही मरेने रॉब्रेडोविरुद्ध पाच मॅचपॉइंट्स वाचवत जेतेपदाची कमाई केली होती.
२८ दिवसांत २०वा सामना खेळणाऱ्या मरेच्या कामगिरीत थकव्याची लक्षणे जाणवली. पहिला सेट गमावल्यानंतर जिद्दीने पुनरागमन करणाऱ्या मरेने दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये मॅचपॉइंट्स वाचवत कारकिर्दीतील ३१व्या जेतेपदावर नाव कोरले. तीन तास आणि १९ मिनिटांसह यंदाच्या हंगामातली ही सर्वाधिक वेळ चाललेली एटीपी स्पर्धेची अंतिम लढत होती.
या जेतेपदासह वर्षांअखेरीस होणाऱ्या एटीपी वल्र्ड टूर फायनल्स स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी मरेने जोरदार आगेकूच केली आहे. मरेने या जेतेपदासह जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेपूव मरे केवळ एकच अर्थात पॅरिस मास्टर्स स्पर्धा खेळणार आहे.
पहिल्या सेटमध्ये रॉब्रेडोच्या झंझावाती खेळासमोर मरे निष्प्रभ ठरला. मात्र दुसऱ्या सेटमध्ये त्याने ४-४ अशी बरोबरी केली. टायब्रेकरमध्ये खेळ उंचावत मरेने सामना १-१ बरोबरीत आणला. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये मरेला पायाच्या दुखापतीने सतवले आणि दोनवेळा त्याच्या हातून दुहेरी चुका झाल्या. याचाच फायदा उठवत रॉब्रेडोने ४-३ अशी आघाडी घेतली. मात्र यानंतर मरेने शानदार पुनरागमन करत मुकाबला टायब्रेकरमध्ये नेला. रॉब्रेडोच्या चुकांचा फायदा उठवत मरेने तिसरा सेट नावावर केला आणि जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. दुखापतींचा ससेमिरा मागे लागल्याने विम्बल्डन जेतेपदानंतर मरेच्या कामगिरीत मोठय़ा प्रमाणावर घसरण झाली आहे.

‘‘हा सामना अविश्वसनीय असाच होता. टॉमी लढवय्या खेळाडू आहे. ३२ वर्षांचा असूनही त्याची तंदुरुस्ती वाखाणण्याजोगी आहे. त्याचा खेळ दिवसेंदिवस सुधारत आहे. त्याच्याप्रती माझा आदर दुणावला आहे.’’
– अँडी मरे, आंतरराष्ट्रीय टेनिसपटू

 ‘‘मरेची विजिगीषु वृत्ती अपवादात्मक आहे. त्याच्यासारखा खेळाडू प्रतिस्पध्र्याला आगेकूच करण्याची जराशीही संधी देत नाही. त्याला मी टक्कर देऊ शकलो आणि ही एक झुंजार लढत झाली.’’
– टॉमी रॉब्रेडो, आंतरराष्ट्रीय टेनिसपटू