मरेची दुसऱ्यांदा विजेतेपदाला गवसणी; कॅनडाच्या राओनिकचे स्वप्न अधुरेच

कारकीर्दीतील पहिलेवहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद आणि तेही विम्बल्डन टेनिसच्या रूपात जिंकण्याचे स्वप्न कॅनडाच्या मिलोस राओनिकला साकारता आले नाही. घरच्या क्रीडारसिकांच्या साक्षीने ब्रिटनच्या अँडी मरेने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले आणि तो या आनंदाच्या क्षणी ढसाढसा रडायला लागला.. कारण २०१३मध्ये मरेने प्रथमच विम्बल्डन विजेतेपद जिंकताना एक नवा इतिहास रचला होता. १९३६मध्ये फ्रेड पेरीने जेतेपद पटकावल्यानंतर तब्बल ७७ वर्षांनी मरेने आपल्या देशाला हे प्रतिष्ठेचे विजेतेपद जिंकून दिले होते. याच ऋणानुबंधाच्या नात्यामुळे इंग्लिश जनतेने मरेच्या विजयाचा आनंद अभिमानाने साजरा केला.

ऑल इंग्लंड क्लबच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात मरेचे पारडे जड होते. मात्र रॉजर फेडररसारख्या बलाढय़ खेळाडूवर मात करीत अंतिम फेरीत स्थान मिळवणाऱ्या राओनिककडून त्याच पराक्रमाची अपेक्षा होती. मरेने त्याचा अपेक्षाभंग करीत ६-४, ७-६ (७-३), ७-६ (७-२) अशा फरकाने विजय मिळवत कारकीर्दीतील तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. मरेने २०१२मध्ये अमेरिकन ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकले होते.

द्वितीय मानांकित मरेने सुरुवातीपासूनच खेळावर नियंत्रण मिळवले होते. त्याने फोरहॅण्डच्या फटक्यांचा सुरेख खेळ केला. राओनिकची व्हॉलीजवर जास्त भर होती. पहिल्या सेटमध्ये सातव्या गेमच्या वेळी मरेला सव्‍‌र्हिसब्रेकची संधी मिळाली. राओनिकने बॅकहॅण्ड परतीचे फटके मारताना केलेल्या चुकांचा त्याला फायदा झाला. हा महत्त्वपूर्ण ब्रेक मिळवत मरेने पहिला सेट केवळ ४१ मिनिटांमध्ये जिंकला. प्रथमच अंतिम फेरी खेळत असलेल्या राओनिकच्या चेहऱ्यावर खूप मानसिक दडपण जाणवत होते.

मरे व राओनिक या दोघांनीही क्रॉसकोर्ट फटक्यांचाही उपयोग केला; परंतु राओनिकने बेसलाइनवर व्हॉलीज टाकण्याचा प्रयत्न केला. मरेला सातव्या व नवव्या गेममध्ये ब्रेकची संधी मिळाली होती, मात्र दोन्ही वेळा राओनिकने बिनतोड सव्‍‌र्हिसचा उपयोग करीत त्याला या संधीपासून वंचित ठेवले. दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी सहा गेम्स घेतल्यानंतर टायब्रेकरचा उपयोग करण्यात आला. त्यामध्ये मरेने दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळवला. टायब्रेकर ७-३ असा जिंकत त्याने दुसरा सेटहीजिंकला.

पहिले दोन सेट गमावल्यानंतर राओनिकने तिसऱ्या सेटमध्ये चिवट झुंज देण्याचा प्रयत्न केला. पाचव्या गेमच्या वेळी त्याला सव्‍‌र्हिसब्रेकची संधीदेखील लाभली होती. मात्र परतीचे फटके मारताना केलेल्या नकळत चुकांमुळे त्याला ही संधी साधता आली नाही. ६-६ अशा गेम्सच्या बरोबरीनंतर झालेल्या टायब्रेकरमध्ये मरे याने निर्विवाद वर्चस्व गाजवले. त्याने दोन सव्‍‌र्हिसब्रेक मिळवत ५-० अशी आघाडी घेतली. तेथेच राओनिकचा पराभव स्पष्ट झाला होता. मरेने पुन्हा सातव्या सव्‍‌र्हिसच्या वेळी ब्रेक मिळवला. हे ब्रेक नोंदवताना त्याने क्रॉसकोर्ट फटक्यांचा आत्मविश्वासाने उपयोग केला. हा टायब्रेकर ७-२ असा जिंकत त्याने पुन्हा या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले.

विम्बल्डन हे माझे दैवत आहे आणि येथे पुन्हा विजेता होण्याचे स्वप्न मी साकार करू शकलो याच्यापेक्षा आणखी वेगळा आनंद असूच शकत नाही. हे विजेतेपद मिळवण्यासाठी मी खूप मेहनत केली होती. अर्थात राओनिकनेही सुरेख खेळ केला. त्याची ही पहिलीच अंतिम फेरी होती. माझ्यासाठी येथील अंतिम लढत नवीन नाही, हाच फरक माझ्यासाठी निर्णायक ठरला.

  – अँडी मरे

अंतिम लढतीत माझा खेळ अपेक्षेइतका झाला नाही. मी परतीच्या फटक्यांवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. विम्बल्डनचे उपविजेतेपदही आमच्या देशासाठी अभिमानास्पद आहे. पुढील वर्षी मी येथे अजिंक्यपद मिळवण्याचा प्रयत्न करीन.

  – मिलोस राओनिक