कोल्हापुरातील शाहू स्टेडियम फुटबॉलचे सामने पाहून त्याला प्रेरणा मिळाली.. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेले स्टेडियम आणि खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचा प्रेक्षकांचा तो आटापिटा, हे त्याचे ऊर्जास्त्रोत बनले.. आपणही एके दिवशी अशाच प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये खेळणार हा निर्धार मनाशी पक्का होता; पण आर्थिक अडचणींचे अडथळे त्याच्या मार्गावर होते..मात्र वडिलांनी दिवसरात्र काबाडकष्ट केले.. आई, बहीण आणि आजी या कुटुंबातील सदस्यांनी त्याच्या मार्गातील अडथळे उखडून फेकले.. त्याचेच फलित म्हणून या मऱ्हाटमोळ्या पठ्ठय़ाची फिफा कुमार (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारताच्या फुटबॉल संघात निवड झाली आहे.. कोल्हापूरचा अनिकेत जाधव ‘भारतीय नेयमार’ म्हणून आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झाला आहे.. ६ ऑक्टोबर २०१७ला नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर अनिकेत आपले विश्वचषकाचे स्वप्न साकार करण्यासाठी उत्सुक आहे.

विश्वचषक स्पर्धेसाठी अंतिम २१ सदस्यीय भारतीय संघात निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना अनिकेत म्हणाला, ‘‘विश्वचषक स्पर्धेत १०० टक्के खेळ करणे, हेच लक्ष्य सध्या डोळ्यांसमोर आहे. ही माझ्यासह सहकाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. आता माझ्या फुटबॉल कारकीर्दीला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेसाठी मी सज्ज आहे.’’

२००८ ला कोल्हापूर सोडून पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीत जाणे आणि तेही घरच्यांपासून दूर, हा निर्णय अवघड होता. परंतु अनिकेतच्या मजबूत निर्धारापुढे त्यानेही गुडघे टेकले. याबाबत तो म्हणला, ‘‘कुटूंबापासून दूर राहण्याचा निर्णय कठीण होता, परंतु मी एक स्वप्न पाहिले होते, एक उत्तम फुटबॉलपटू बनण्याचे आणि त्यासाठी मी प्रचंड मेहनत घेतली. माझे स्वप्न साकारण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकाने हातभार लावला. यात वडिलांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी माझ्यासाठी, माझ्या स्वप्नासाठी दिवसरात्र रिक्षा चालवून काबाडकष्ट केले. आई, बहीण आणि आजी यांनीही आपापल्या परीने मला प्रोत्साहन दिले. मी नशीबवान आहे मला असे वडील, असं कुटुंब मिळाले. या सर्वाचा मी अत्यंत आभारी आहे.’’

या क्रिकेटवेडय़ा देशात फुटबॉलपटू होण्याचे स्वप्न तू कसे जपलेस, या प्रश्नाला उत्तर देताना अनिकेत म्हणाला, ‘‘याबद्दल मी कधी विचार केला नाही. फुटबॉल हाच सर्वोत्तम खेळ आहे आणि प्रत्येक दिवशी मी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली. पुढील काही वर्षांत क्रिकेटएवढाच फुटबॉलही भारतात लोकप्रिय होईल, याची मला खात्री आहे.’’

‘भारतीय नेयमार’

पूर्वाश्रमीचा बार्सिलोना क्लबचा आणि आता पॅरिस सेंट-जर्मेन क्लबचा नेयमार (ज्युनियर) हा अनिकेतचा आदर्श खेळाडू. ब्राझिलच्या नेयमारची चपळता, प्रतिस्पर्धी खेळाडूंना चकवण्याचे कौशल्य यांचा प्रचंड प्रभाव अनिकेतच्या खेळात दिसतो, म्हणूनच ‘भारतीय नेयमार’ अशी ओळख त्याने निर्माण केली आहे.

कुटुंबाच्या त्यागाला फळ मिळाले – अनिल जाधव

‘‘महालक्ष्मी मंदिरात आम्ही कुटुंबीय पालखीसाठी गेलो होतो. तेव्हा अनिकेतचा फोन आला की भारतीय संघ जाहीर झाला असून, त्यात माझी निवड झाली आहे. त्याच्या या बातमीने आमचा आनंद द्विगुणित केला,’’ असे अनिकेतचे वडील अनिल जाधव यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ‘‘चौथीत असताना तो फुटबॉलसाठी सांगलीत गेला. एका  वर्षांनंतर तेथून पुण्यात. पण एवढय़ा लहान वयात घरापासून त्याला दूर ठेवण्याच्या निर्णयावर बरीच खडाजंगी झाली. पण आज आमच्या त्या त्यागाचे फलित मिळाले. अनिकेतला पहिल्या विश्वचषक स्पर्धेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण कुटुंब ३ ऑक्टोबरला दिल्लीला जाणार आहोत.’’

आठव्या वर्षांपासून मी फुटबॉल खेळायला सुरुवात केली. शाहू स्टेडियममधील फुटबॉल सामन्यांचे माझ्या कारकिर्दीत अतिशय महत्त्व आहे. त्यानंतर नेयमार माझ्यासाठी प्रेरणादायी ठरला.  त्याचे कौशल्य आत्मसात करण्याचा मी प्रयत्न करतो. सहकारी मला ‘भारतीय नेयमार’ म्हणून संबोधतात तेव्हा स्वत:चाच अभिमान वाटतो.  – अनिकेत जाधव