वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात ‘चायना मेन’ कुलदीप यादवने भारतीय संघात पदार्पण केले. कुलदीपने त्याच्या गोलंदाजी शैलीसोबतच कामगिरीने देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे मैदानात त्याला कामगिरी दाखवण्याची संधी मिळाली नाही. मात्र दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मिळालेल्या संधीच कुलदीपने सोनं केले. या सामन्यात ९ षटकांत त्याने ४७ धावा देत ३ बळी मिळवत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

अश्विनला पर्यायी गोलंदाजीची गरज असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगत असताना कुलदीपने दमदार खेळी केली आहे. त्यामुळे कामगिरीत सातत्य राखून तो अश्विनची जागा घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. विराटच्या नेतृत्त्वाखाली एकदिवसीय क्रिकेटची कॅप घालणाऱ्या कुलदीपने ऑस्ट्रेलियाविरुद्दच्या कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली.  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील रांचीतील सामन्यात त्यावेळचे भारतीय प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना कुलदीपला अकरामध्ये खेळवण्याला पसंती दिली होती. पण विराट कोहलीच्या नकारामुळे कुलदीपला रांचीच्या मैदानात उतरता आले नाही. या मालिकेतील अखेरच्या आणि चौथ्या सामन्यात खांद्याच्या दुखापतीमुळे कर्णधार विराट कोहलीला बाहेर बसावे लागले. याचवेळी चौथ्या सामन्यात कुलदीपची एन्ट्री झाली. अर्थात कुंबळेंच्या पसंतीला या सामन्यात यश देखील आले. या सामन्यात कुंबळेंचा विश्वास सार्थ ठरवत त्याने ४ विकेट्स मिळवून लक्षवेधी कामगिरी केली. हा सामना भारताने ८ गडी राखून जिंकला होता.

भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. रविवारी झालेल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला तब्बल १०५ धावांनी पराभूत केले होते. या सामन्यात भारताने ३०० धावांचा टप्पा पार करत ऑस्ट्रेलियाचा अधिकवेळा ३०० धावा उभारण्याचा विश्वविक्रम मोडीत काढला होता. भारतीय संघाने आतापर्यंत एकूण ९६ वेळा ३०० चा टप्पा पार केला आहे.