कुंबळे-कोहली यांच्यातील टोकाचे मतभेद उघड

कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील मतभेद आता चव्हाटय़ावर आले असून, या दोघांमध्ये गेली सहा महिने संवादच नव्हता, अशी धक्कादायक माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांकडून मिळाली आहे. याचप्रमाणे सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने कुंबळे यांना प्रशिक्षकपदासाठी मुदतवाढ देण्याकरिता थेट हिरवा कंदील दिला नव्हता.

‘‘कुंबळे यांना मुदतवाढ देण्यासाठी सल्लागार समिती अनुकूल आहे, अशा प्रकारची वृत्ते प्रसारमाध्यमांमध्ये दिसून आली होती. कुंबळे यांच्या नावाला सल्लागार समितीने अनुकूलता दर्शवली, परंतु त्यासोबत एक अटसुद्धा घातली होती. सर्व प्रकारच्या प्रलंबित वादांवर तोडगा निघत असेल, तरच कुंबळे यांना प्रशिक्षकपदावर कायम ठेवावे, असे या समितीने म्हटले होते,’’ अशी माहिती बीसीसीआयकडून मिळाली आहे.

आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघाचा निवास असलेल्या हॉटेलमध्ये तीन स्वतंत्र बैठका झाल्या. कुंबळे आणि कोहली यांनी बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह क्रिकेट सल्लागार समितीची भेट घेतली. त्यानंतर एका टेबलावर कुंबळे आणि कोहली समोरासमोर बसले. परंतु दोघांनी एकही शब्द न उच्चारल्यामुळे ही बैठक निष्फळ ठरली.

‘‘इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका संपली, तेव्हापासून म्हणजे मागील सहा महिने या दोघांमधील संवाद संपुष्टात झालेला आहे. समस्या असतात, परंतु संवादच नसल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. रविवारी अंतिम सामन्यानंतरच्या या बैठकीत मतभेद दूर होऊ शकणार नाही, हे स्पष्ट झाले,’’ असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा आम्ही स्वतंत्रपणे कुंबळे यांच्याशी बोलून काही समस्या आहे का, असा प्रश्न विचारला तेव्हा विराटसोबत कोणतीही समस्या नसल्याचे त्यांनी सांगितले. कुंबळे यांच्या कार्यपद्धतीसंदर्भातील काही बाबतीत विराटला आक्षेप होता, ही माहिती मग पुढे आली. मात्र कुंबळे यांच्याकडून मात्र कोणतीही तक्रार नव्हती.

वादाच्या जखमेवर मलमपट्टी होणे कठीण आहे, हे लक्षात आल्यावर कुंबळेने वेस्ट इंडिज दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला. कुंबळे यांचे बार्बाडोसचे विमान तिकीट काढण्यात आले होते. त्यांची पत्नीसुद्धा त्यांच्यासोबत या दौऱ्यावर जाण्याची शक्यता होती, अशी माहिती आता पुढे येत आहे.

बीसीसीआयला हवा मतभेदाचा व्यवस्थापकीय अहवाल

नवी दिल्ली : मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील मतभेदाच्या पाश्र्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल चौधरी यांनी भारतीय संघाचे प्रशासकीय व्यवस्थापक कपिल मल्होत्रा यांच्याकडून सविस्तर अहवाल मागवला आहे.

कुंबळे यांच्या तडकाफडकी राजीनाम्याच्या निर्णयाबाबत प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय २४ जूनला मुंबईत बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. आयसीसीच्या वार्षिक परिषदेसाठी जोहरी सध्या इंग्लंडमध्ये आहेत. त्यांनी मल्होत्रा यांच्याकडे अहवालाची मागणी केल्याचे स्पष्ट होत आहे.

कुंबळे यांचे ‘ट्विटर’वरील पत्र-

क्रिकेट सल्लागार समितीने मुख्य प्रशिक्षकपदासाठीच्या कार्यकाळात वाढ करण्याची विचारणा जेव्हा केली, तो क्षण माझ्यासाठी अभिमानास्पद होता. गेल्या वर्षभरात भारतीय संघाने मिळवलेल्या यशाचे श्रेय हे कर्णधार, खेळाडू, प्रशिक्षक आणि सर्व साहाय्यकांना द्यावे लागेल. मात्र माझ्या काम करण्याच्या शैलीवर आणि कार्यकाळ वाढवण्याबाबत कर्णधाराला आक्षेप असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) पहिल्यांदाच कळवण्यात आले. कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यातील मर्यादांचा मी नेहमी आदर केला. त्यामुळेच हे ऐकून आश्चर्य वाटले.

कर्णधार आणि माझ्यातील गरसमज दूर करण्याचा बीसीसीआयने प्रयत्नही केला. मात्र त्यातून तोडगा निघाला नाही. त्यामुळे पदावरून पायउतार होण्याचा निर्णय मी घेतला. व्यावसायिकपणा, शिस्त, वचनबद्धता, प्रामाणिकपणा, कौशल्य आणि दृष्टिकोन हे माझ्या कामाचे सूत्र होते. चांगल्या कामगिरीसाठी या गोष्टी आवश्यकच आहेत. प्रशिक्षकाची जबाबदारी ही समोर आरसा धरून उभा राहणाऱ्यासारखी असते. संघाला पाहिजे, तसा बदल प्रशिक्षकाने करायचा असतो, हे मीदेखील पाहिलेले आहे. हे सर्व पाहता या जबाबदारीतून मुक्त होण्याचा मार्ग मी निवडला. गेल्या एक वर्षांपासून मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करताना आनंद वाटला. त्यासाठी क्रिकेट सल्लागार समिती, बीसीसीआय आणि क्रिकेट प्रशासनाचे आभार मानतो. भारतीय क्रिकेटच्या असंख्य चाहत्यांनाही मी धन्यवाद देऊ इच्छितो. भारतीय क्रिकेटचा मी नेहमी हितचिंतक राहीन.