माजी कर्णधार अनिल कुंबळे यांची भारताच्या प्रशिक्षकपदावर एका वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी ही घोषणा केली.

भारताच्या प्रशिक्षकपदासाठी एकूण ५७ अर्ज आले होते, त्यापैकी प्राथमिक पडताळणीत २१ जणांची निवड करण्यात आली होती. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने यापैकी दहा उमेदवारांची मुलाखत घेतली होती. यामध्ये कुंबळेसह संघाचे माजी संचालक रवी शास्त्री, माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी आणि स्टुअर्ट लॉ यांचा समावेश होता.

कोलकाता येथे क्रिकेट सल्लागार समितीमधील सदस्य व माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांनी दहा उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आणि आपला निर्णय बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांना सादर केला. त्यानंतर गुरुवारी झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीमध्ये कुंबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

‘‘बीसीसीआय कामकाज पारदर्शक आहे. या पदासाठी आम्ही काही गोष्टी ठरवल्या होत्या. क्रिकेट सल्लागार समितीनेही यामध्ये मोलाचे योगदान दिले. सल्लागार समितीने काही उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आणि आम्हाला त्याबाबत अहवाल सादर केला. या अहवालावर चर्चा करून अनिल कुंबळे यांना संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी एका वर्षांसाठी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’’ असे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

भारतीय प्रशिक्षकपदाच्या निवडीबाबत ठाकूर पुढे म्हणाले की, ‘‘प्रशिक्षकाची निवड करताना भारतीय आणि विदेशी, असा काहीच मुद्दा नव्हता. आम्हाला या पदासाठी सर्वोत्तम व्यक्ती हवी होती. त्यामुळे फक्त भारतीय व्यक्तीच प्रशिक्षक व्हावी, असा आमचा कोणत्याही प्रकारचा अट्टहास नव्हता.’’

भारताकडून सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये कुंबळे अग्रस्थानी आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुथय्या मुरलीधरन व शेन वॉर्न यांच्यानंतर सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये कुंबळेचा तिसरा क्रमांक लागतो. कुंबळे यांनी १३२ कसोटीत  ६१९ बळी मिळवले आहेत, तर २७१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३३७ बळी मिळवले आहेत. पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्याच्या एका डावात दहा बळी मिळवण्याची किमयाही कुंबळे यांनी केली होती. कुंबळे यांनी १४ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्वही केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर कुंबळे यांनी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद सांभाळले होते. मग राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्षपदही भूषवले होते. बीसीसीआयच्या तांत्रिक समितीवरही कुंबळे कार्यरत होते. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू मुंबई इंडियन्स या आयपीएल संघांना कुंबळे यांनी मार्गदर्शन केले आहे. बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली असली तरी साहाय्यक प्रशिक्षकांची निवड अजूनही जाहीर व्हायची आहे.

प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमधील बऱ्याच उमेदवारांकडे आंतरराष्ट्रीय संघांचा अनुभव होता, पण कुंबळे यांनी एकाही आंतरराष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळलेले नाही. पण तरीही त्यांची निवड का करण्यात आली, या प्रश्नावर ठाकूर म्हणाले की, ‘‘कुंबळे यांनी भारताला बरेच सामने एकहाती जिंकून दिले आहेत. नावावर बरेच विक्रम आहेत, हे सारे मुद्दे कुंबळे यांच्या बाबतीत महत्त्वाचे ठरले. एका वर्षांनंतर कुंबळेच्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे.’’

‘खेळाडू अग्रस्थानी, प्रशिक्षक पडद्यामागे!’

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद ही प्रचंड मोठी जबाबदारी आहे. अशा स्वरुपाच्या खडतर आव्हानासाठी मी सज्ज आहे. मात्र खेळाडूंना प्राधान्य असेल. प्रशिक्षकाची भूमिका पडद्यामागची असते. भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये नव्या भूमिकेसह परतणे ही सन्मानाची गोष्ट आहे.जिंकणे हेच कायम उद्दिष्ट असेल. प्रत्येक मालिकेसाठी, प्रतिस्पध्र्यासाठी रणनीती या गोष्टी खेळाडूंशी चर्चा केल्यानंतर ठरवण्यात येतील. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी डोक्यात योजना आहेत. खेळाडूंशी लवकरच भेट होईल. त्यानंतर चर्चा होऊ शकेल. भारतीय क्रिकेटसाठी हा सुवर्णकाळ आहे. सचिन, सौरव, व्ही.व्ही.एस यांच्यासह मी अनेक वर्षे खेळलो. राहुल कनिष्ठ संघाला मार्गदर्शन करतो आहे. आम्हा पाचही जणांत उत्तम सुसंवाद आहे. त्यांच्यासह काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. प्रशिक्षकपद स्वीकारण्यासंदर्भात कुटुंबियांशी चर्चा केली. खेळाडू म्हणून १८ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी पाठिंबा दिला. तसाच पाठिंबा या निर्णयामागेही आहे.

-अनिल कुंबळे

 

Twitter : anilkumble1074 सर मनापासून स्वागत. आमच्यासोबत तुमच्या कार्यकाळासाठी उत्सुक आहोत. तुमच्यासोबतचे भारतीय क्रिकेटमधील संस्मरणीय क्षण आजही आठवणीत टिकून आहेत.

-विराट कोहली

 

क्रिकेट निवृत्तीनंतरची कामगिरी

*  कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद

*   राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्षपद

*   बीसीसीआयच्या तांत्रिक समितीचे सदस्य

*  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मार्गदर्शक

*  मुंबई इंडियन्सचे प्रमुख मार्गदर्शक

 

1