अनिल कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर अखेर कर्णधार विराट कोहलीनेही मौन सोडले आहे. ‘अनिलभाईंनी त्यांचे मत मांडले असून राजीनामा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मी त्यांच्या निर्णयाचा आदर करतो’ असे विराट कोहलीने म्हटले आहे. ‘ड्रेसिंग रुममधील चर्चा कधीच उघड करणार नाही’ असेही कोहलीने स्पष्ट केले आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोर्ट ऑफ स्पेनमध्ये विराट कोहलीने प्रशिक्षक अनिल कुंबळेसोबतच्या वादावर मौन सोडले. विराट म्हणाला, अनिल कुंबळेने घेतलेल्या निर्णयाचा मी आदर करतो. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतरच या घडामोडी घडल्या. चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान ११ वेळा पत्रकार परिषद झाली. आम्ही गेल्या ३ ते ४ वर्षात ड्रेसिंग रुममधील गोष्टी बाहेर येऊ द्यायची नाही याची दक्षता घेतली. संपूर्ण संघाची तीच भावना असल्याचे विराटने स्पष्टकेले. मला क्रिकेटपटू म्हणून अनिल कुंबळे आणि त्याने भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाचा आदर असल्याचे कोहलीने आवर्जून सांगितले.

प्रशिक्षक आणि कर्णधारामधील वादाचा टीम इंडियाच्या कामगिरीवर परिणाम होईल असे वाटत नाही का असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर कोहली म्हणाला, ड्रेसिंग रुमचे पावित्र्य जपणे गरजेचे असते आणि आमच्यासाठी ड्रेसिंग रुम ही खासगी बाब आहे. तिथे काय चर्चा होते हे मी कधीच जाहीरपणे सांगू शकणार नाही असे त्याने स्पष्ट केले.

कोहली आणि  अनिल कुंबळे यांच्यातील मतभेद काही दिवसांपूर्वीच चव्हाट्यावर आले होते. या दोघांमध्ये गेली सहा महिने संवादच नव्हता, अशी धक्कादायक माहितीही समोर आली होती. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कुंबळे आणि कोहली यांनी बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह क्रिकेट सल्लागार समितीची भेट घेतली. त्यानंतर एका टेबलावर कुंबळे आणि कोहली समोरासमोर बसले. परंतु दोघांनी एकही शब्द न उच्चारल्यामुळे ही बैठक निष्फळ ठरली होती. वेस्ट इंडिज दौऱ्याला टीम इंडिया रवाना झाली. पण अनिल कुंबळे त्यांच्यासोबत गेला नव्हता.