क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) माजी फिरकीपटू अनिल कुंबळेला वेस्ट इंडिज दौऱ्यांपर्यंत टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला काही दिवस ‘अॅडजस्ट’ (जमवून घेण्याचा) करण्याचा सल्लाही दिला आहे. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची नेमणूक व्हावी यासाठी कोहली प्रयत्नरत होता. याचदरम्यान सीएसीने क्रिकेट मंडळाला प्रशिक्षक नियुक्तीची हा पेच सोडवण्यासाठी वेळ मागितला आहे.

गुरूवारी रात्री सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या सीएसीने बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांची लंडनमध्ये भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये प्रशिक्षक पदाबाबत सुमारे दोन तास चर्चा झाली. रात्री उशिरापर्यंत सीएसीने क्रिकेट मंडळाला आपल्या निर्णयाची माहिती दिली आणि हा पेच सोडवण्यासाठी काही वेळ मागितला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीएसीच्या सदस्यांनी कुंबळे आणि कोहली यांच्याबरोबर चर्चा केली आहे.

सीएसीच्या निर्णयानंतर भारतीय कर्णधार आणि प्रशिक्षकामधील अंतर्गत कलह टाळण्यासाठी मदत होऊ शकते. दोघांच्या तक्रारींमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या अपेक्षांना धक्का बसू शकतो.  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर लगेच हटवणार नाही, असा भरवसा सीएसीने कुंबळेला दिला. आता कुंबळे टीम इंडियाबरोबर वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जातील. हा छोटा दौरा असून यामुळे काही अडचण येऊ शकत नाही. काही दिवसांसाठी कोहलीने जमवून घ्यावे, असेही समितीने म्हटले आहे. दरम्यान, प्रशिक्षक पदासाठी अर्ज केलेल्यांची मुलाखत कधी घेणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भारतीय संघ २० जून रोजी लंडनवरून वेस्टइंडिजला रवाना होईल. १० जुलै रोजी टीम इंडिया भारतात पोहोचले. कुंबळेच्या नियुक्तीवर २६ जून रोजी होणाऱ्या बीसीसीआयच्या बैठकीत निर्णय होऊ शकतो.