भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आपल्या कारकीर्दीत खेळपट्टीवर मानसिकरित्या सर्वात भक्कम खेळाडू म्हणून ओळखला गेला. पण मैदानाबाहेर सचिनने आपल्या निवृत्तीनंतर त्याच्या आठवणीतील काही भावनिक प्रसंग देखील आजवर सांगितले. त्यातील असाच एक सचिनसाठी अविस्मरणीय क्षण म्हणजे माजी फिरकीपटू आणि सध्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिक कुंबळे यांच्या निवृत्तीचे भाषण.
अनिल कुंबळेचा दिल्लीत झालेला अखेर कसोटी सामना आणि त्याने केलेले निवृत्तीचे भाषण आमच्या सर्वांसाठी खूप भावूक क्षण होता. भारताला गोलंदाजीच्या जोरावर सामने जिंकून देण्यात कुंबळेने नाव कमावले होते. संघासाठी तो खूप मोठा खेळाडू होता. जवळपास दोन दशकं मी त्याच्यासोबत खेळलो, असे सचिनने आपल्या आत्मचरित्रात नमूद केले होते.

 

कुंबळेने निवृत्तीचा विचार करत असल्याचे जेव्हा सांगितले तेव्हाच आम्हाला धक्का बसला होता. आपल्याकडून अपेक्षित गोलंदाजी होत नसल्याचे तेव्हा कुंबळेचे म्हणणे होते. पण मी कुंबळेकडे निवृत्तीचा न घेण्याचा हट्ट केला होता. कारण माझ्या मते तो तेव्हा चांगली कामगिरी करत होता. त्याची फक्त ८० टक्के कामगिरी देखील प्रतिस्पर्ध्यांना पुरून उरण्यासाठी पुरेशी होती, असेही सचिनने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱयावर आला असतानाच कुंबळे यांनी निवृत्ती जाहीर केली होती. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० ने आघाडी घेतली होती. तर तिसरा कसोटी सामना दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमवर खेळविण्यात आला होता. या सामन्यात कुंबळेने आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता.