लांब उडीपटू अंकित शर्माला आशियाई मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. सरावाचे ठिकाण कळवण्याची माहिती न कळवल्याबद्दल त्याला स्थान देण्यात आले नव्हते. झालेल्या चुकीबद्दल त्याने माफी मागितल्यानंतर त्याचा संघात समावेश करण्यात आला. दरम्यान, द्युती चंदने सरावात चांगली कामगिरी केली तर तिलाही या स्पर्धेत संधी मिळणार आहे.
वुहान येथे ३ ते ७ जूनदरम्यान आशियाई स्पर्धा होणार आहे. त्यामध्ये पदक मिळविण्याबाबत अंकितवर भारताची मोठी मदार आहे. मंगलोर येथे झालेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तो राष्ट्रीय क्रीडा संस्था (पतियाळा) येथे सराव करीत असे. मात्र त्याने भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाची परवानगी न घेता पतियाळाऐवजी थिरुवनंतपूरम् येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणात सराव करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे महासंघाने भारतीय संघात त्याला स्थान दिले नव्हते. महासंघाकडे लेखी माफीचे पत्र दिल्यानंतर महासंघाने त्याची भारतीय संघात निवड केली.
महासंघाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले, ‘‘अंकितने कोणालाही न कळविता अचानक सरावाचे ठिकाण बदलले. जर प्रत्येक खेळाडू असे कृत्य करीत राहिला तर किती गोंधळ निर्माण होईल. अंकितने माफीचे निवेदन दिले असून, त्याच्या या माफीपत्रास महासंघाने मान्यता दिली आहे.’’
अंकितच्या समावेशामुळे आशियाई स्पर्धेत लांब उडीत भारताचे अंकित व राष्ट्रीय विक्रमवीर कुमारावळ प्रेमकुमार हे दोन स्पर्धक असतील. प्रेमकुमार हा अमेरिकेत सराव करीत असून, नुकताच त्याने आठ मीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत उडी मारली आहे. अंकित याने केरळमध्ये यंदा झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविताना आठ मीटरचा टप्पा ओलांडला होता.
द्युती चंदने चार बाय १०० मीटर रिले शर्यतीत भाग घेण्याची संधी आहे, मात्र त्याकरिता तिला २७ मे रोजी होणाऱ्या चाचणीत चांगली कामगिरी करावी लागणार आहे. फेडरेशन चषक स्पर्धेत तिची कामगिरी खराब झाल्यामुळे तिला १०० व २०० मीटर अंतराच्या शर्यतींसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. या शर्यतीत तिची सहकारी श्रावणी नंदाला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.