एल. देवेंद्रो सिंगचे रौप्यपदकावर समाधान

भारताच्या अंकुश दहियाने उलानबाटर चषक बॉक्सिंग स्पध्रेत पुरुषांच्या ६० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. मात्र अनुभवी बॉक्सिंगपटू एल. देवेंद्रो सिंग (५२ किलो) याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

युवा आशियाई स्पध्रेतील माजी रौप्यपदक विजेत्या १९ वर्षीय अंकुशने कोरियाच्या मॅन चोए चोलवर सहज विजय मिळवला, तर देवेंद्रोला इंडोनेशियाच्या अल्डोम्स सुगूरोने पराभूत केले. वरिष्ठ स्थराच्या आंतरराष्ट्रीय स्पध्रेतील अंकुशचे हे पहिलेच पदक आहे.

भारताने या स्पध्रेत एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्यपदकाची कमाई केली आहे. के. श्याम कुमार (४९ किलो), मोहम्मद हुसामुद्दीन (५६ किलो) आणि प्रियांका चौधरी (६० किलो) यांचा उपांत्य फेरीत शनिवारी पराभव झाला होता. त्यामुळे त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.  राष्ट्रकुल स्पर्धेतील आणि आशियाई अजिंक्यपद स्पध्रेतील माजी रौप्यपदक विजेता देवेंद्रो सुगूरोविरुद्ध आक्रमक खेळ केला. दुखापतीतून सावरणाऱ्या या मणिपूरच्या खेळाडूने प्रतिस्पर्धी खेळाडूला कडवी टक्कर दिली. मात्र सुगूरोचा उत्तम बचाव भेदण्यात त्याला अपयश येत होते. या लढतीत चांगला खेळ करूनही पंचांनी सुगूरोच्या बाजूने निर्णय दिला आणि भारतीय चाहते निराश झाले. सुगूरोने ३-२ अशा फरकाने विजय मिळवत सुवर्णपदक निश्चित केले.