क्रिकेटविश्वात उंची गाठलेल्या माजी क्रिकेटपटूंचे मार्गदर्शन लाभणे बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेटसाठी फायदेशीर गोष्ट आहे. वेळ येईल तेव्हा योग्यवेळी योग्य घोषणा केली जाईल असे सांगत बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी राहुल द्रविडच्या बीसीसीआयमधील भूमिकेबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. बीसीसीआयच्या सल्लागार समितीत द्रविडचा समावेश न केल्याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात अनुराग ठाकूर म्हणाले की, भारतीय क्रिकेटला सोनेरी क्षण मिळवून देण्यात सचिन, सौरव, लक्ष्मण, द्रविड या दिग्गजांचे मोलाचे योगदान होते. क्रिकेटच्या कल्याणासाठी या दिग्गज क्रिकेटपटूंच्या सल्ल्याची आवश्यकता नक्कीच आहे. त्यामुळे सगळे बीसीसीआयच्या एकाच पॅनलमध्ये असतीलच असे नाही, असे सांगत द्रविडवर टीम इंडियाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात येण्याचे संकेत देखील अनुराग ठाकूर यांनी यावेळी दिले.