भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नवनिर्वाचित सचिव अनुराग ठाकूर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. अनुराग ठाकूर एका पार्टीत बुकीसोबत दिसल्याची माहिती मिळाल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) या प्रकरणावरून बीसीसीआयची कानउघडणी केल्याचे समजते. मात्र, या प्रकरणाला श्रीनिवासन व अनुराग ठाकूर यांच्यातील छुपा वादाची किनार असल्याचीचर्चा सोशल मडिया आणि माध्यमांमध्ये रंगली आहे.
मार्चमध्ये बीसीसीआयच्या सचिवपदी निवड होताच अनुराग ठाकूर यांनी चंदिगडमध्ये एक पार्टी ठेवली होती. या पार्टीत केक कापत असताना अनुराग ठाकूर यांच्या शेजारी करण गिल्होत्रा हा संशयित बुकी दिसत होता. अनुराग ठाकूर व करण गिल्होत्राचे छायाचित्र आयसीसीला मिळाले असून आयसीसी अध्यक्ष डेव रिचर्डसन यांनी बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमीया यांना ईमेल पाठवत आपली नाराजी दर्शवली असल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.
करण गिल्होत्राचा आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी समितीच्या काळ्या यादीत समावेश आहे. गिल्होत्राने आयपीएलमध्ये खेळाडू आणि संघ व्यवस्थापनातील व्यक्तींशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला होता. बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी समितीचे तत्कालीन प्रमुख रवी सवानी यांनीदेखील सर्व संघ मालकांना पत्र पाठवून गिल्होत्राशी चार हात लांब राहण्याचे निर्देश दिले होते असेही आयसीसीने बीसीसीआयला धाडलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे. बीसीसीआयने मात्र या ईमेलवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, बीसीसीआयचे पायऊतार झालेले अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्याभोवतीचा वादांचा विळखा आणखी घट्ट झाला आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असताना अन्य पदाधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी गुप्तहेर यंत्रणा राबवल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, लंडनस्थित गुप्तहेर यंत्रणेला हे काम सोपवण्यात आले होते आणि त्यासाठी बीसीसीआयचा निधी वापरल्याचे उघड झाले आहे. बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांचे दूरध्वनी आणि ई-मेल हॅक करण्यासाठी बीसीसीआयचे तब्बल १४ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. बीसीसीआयचे नवनियुक्त सचिव अनुराग ठाकूर हे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. त्यामुळेच अनुराग ठाकूर आणि श्रीनिवासन गटामध्ये आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्याची चर्चा आहे.