भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सर्वात युवा अध्यक्ष होणार
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावर अनुराग ठाकूर यांचा राज्याभिषेक होणार आहे. रविवारी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत सर्वात युवा अध्यक्ष म्हणून ठाकूर यांच्या नावावर बिनविरोध शिक्कामोर्तब होणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) स्वतंत्र कार्याध्यक्ष पदावर दावेदारी करण्यासाठी १२ मे रोजी शशांक मनोहर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. सध्या बीसीसीआयचे सचिवपद भूषवणाऱ्या ठाकूर यांना पूर्व विभागातील बंगाल, आसाम, झारखंड, त्रिपुरा आणि नॅशनल क्रिकेट क्लब या सर्व सदस्य संघटनांचा पाठिंबा आहे. त्यामुळे ठाकूर यांच्या नामनिर्देशन पत्रावर सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी स्वाक्षऱ्या केल्या.
रविवारी विशेष सर्वसाधारण सभेनंतर कार्यकारिणीची बैठक होणार आहे. बीसीसीआयच्या सचिवपदासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के प्रमुख दावेदार असतील.
भारतीय क्रिकेटचे शुद्धीकरण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या न्यायमूर्ती आर. एम. लोढा समितीच्या शिफारशी लागू होण्याची चिन्हे आहेत. अशा कठीण कालखंडात ४१ वर्षीय खासदार ठाकूर यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे दिली जाणार आहेत.