जागतिक हॉकी लीग
जिलॉट गोन्झोलो याने केलेल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर अर्जेटिनाने जागतिक हॉकी लीग स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत भारतावर ३-० असा सहज विजय मिळविला.
बलाढय़ अर्जेटिनाने सुरुवातीपासून सामन्यावर नियंत्रण मिळविले होते. पूर्वार्धात त्यांनी २-० अशी आघाडी घेतली होती. या सामन्यात त्यांना आठ पेनल्टी कॉर्नर मिळाले व त्यापैकी तीन संधींचा त्यांनी लाभ घेतला. भारतास केवळ एकच पेनल्टी कॉर्नर मिळाला मात्र त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही.
सामना सुरू होत नाही तोच अर्जेटिनाने वेगवान चाल करीत तिसऱ्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळविला. त्याचा फायदा घेत त्यांच्या गोन्झोलो याने गोल करीत संघाचे खाते उघडले. त्यानंतरही त्यांनीच खेळावर नियंत्रण ठेवले होते. बराच वेळ भारतास बचावात्मक खेळावरच भर द्यावा लागला. २४ व्या मिनिटाला त्यांना पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला. जोअ‍ॅकिन मेनिनीने गोल करत संघाची बाजू बळकट केली.
उत्तरार्धात सुरुवातीला भारताने काही चांगल्या चाली केल्या, मात्र या चालींमध्ये अपेक्षेइतकी अचूकता नव्हती. ५० व्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. तथापि बीरेंद्र लाक्रा याला त्याचा फायदा घेता आला नाही. सामना संपण्यास एक मिनिट बाकी असताना अर्जेटिनाला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा लाभ घेत ६०व्या मिनिटाला गोन्झोलोने आणखी एक गोल करीत संघाला मोठा विजय मिळवून दिला.