माजी विजेत्यांकडून शरसंधान

अर्जुन पुरस्कार हा अतिशय प्रतिष्ठेचा मान असतो, मात्र दुर्दैवाने अलीकडच्या काळात त्याबाबत अनेक गुणवान खेळाडूंना डावलले जात आहे. तसेच या पुरस्कारासाठी अर्ज पाठवावे लागणे, ही अत्यंत शरमेची गोष्ट आहे. त्यामुळे या सन्मानाचे महत्त्वच कमी झाले आहे, अशी खरमरीत टीका माजी ऑलिम्पिक हॉकीपटू अशोक कुमार, एस. श्रीराम यांच्यासह अनेक माजी खेळाडूंनी केली आहे.

मेजर ध्यानचंद यांचे पुत्र व भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार अशोक कुमार म्हणाले, ‘‘खरेच प्रत्येक वर्षी या पुरस्कारांची गरज आहे का? दरवर्षी खिरापतीसारखे हे पुरस्कार वाटले जात आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. शासनाने स्वत:हून या पुरस्काराचे निकष ठरवले आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धा व ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदक मिळवणाऱ्यांनाच हा मान दिला पाहिजे. खरे तर या पुरस्कार विजेत्यांची नावे कोणताही अर्ज न मागता ठरवली पाहिजेत. त्याकरिता सतराशेसाठ कागदपत्रे मागवणे, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. परदेशातील स्पर्धामध्ये शासनाच्या परवानगीनेच खेळाडू सहभागी होत असतात. तसेच संबंधित खेळांच्या संघटनांनाही त्याबाबत माहिती असते. मी पदक मिळवले, याचे तुणतुणे वाजवल्यानंतरच हा मान दिला जाणे ही अत्यंत दु:खद गोष्ट आहे. अर्ज मागवण्यापेक्षा शासनाने धावपटूंना दत्तक घेत त्यांचा विकास केला पाहिजे.’’

आंतरराष्ट्रीय स्क्वॉशपटू सौरव घोषालनेही अर्ज पाठवण्याच्या पद्धतीवर टीका केली आहे. पुरस्कार निवड समितीमधील तज्ज्ञांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंनी कशी कामगिरी केली आहे, याची व्यवस्थित माहिती असते. कोणताही अर्ज न घेता त्यांनी हे पुरस्कार जाहीर केले पाहिजेत.

श्रीराम यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्ण व रौप्यपदकाची कमाई केली आहे. ते म्हणाले, ‘‘१९७२मध्ये मी व व्ही. एस. चौहान आम्ही दोघेही अर्जुन पुरस्कारासाठी पात्र होतो. मात्र त्या वेळी अ‍ॅथलेटिक्सकरिता एकाच खेळाडूची निवड केली जात होती. चौहान हे माझ्यापेक्षा वरिष्ठ असल्यामुळे त्यांना हा मान मिळाला. पुरस्कार मिळवणाऱ्यांनी किमान आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवले पाहिजे.’’

‘‘राजीव गांधी यांच्यापेक्षा महाभारतामधील अर्जुन ही अधिक महत्त्वाची व असामान्य कर्तृत्व लाभलेली व्यक्ती होती. हे लक्षात घेता क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च सन्मानाकरिता गांधी यांचे नाव देणे चुकीचे आहे. अर्जुनाचीच महती कमी केली जात आहे. त्यामुळे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारच काढून टाकायला हवा,’’ असे अनुभवी व्हॉलीबॉल प्रशिक्षक सुरेश मिश्रा यांनी सांगितले.

माजी ऑलिम्पिक हॉकीपटू जफर इक्बाल यांनी मात्र राष्ट्रीय पुरस्कारांचे समर्थन केले. ते म्हणाले, ‘‘खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी असे पुरस्कार अनिवार्य आहेत. या पुरस्कारांचे महत्त्व कमी झाले असे मला वाटत नाही.’’

माजी हॉकीपटू एम. पी. सिंग यांनी अर्जुन पुरस्कारासाठी राष्ट्रकुल स्पर्धामधील कामगिरीचा आधार घेतला जाऊ नये, असे सुचविले. ते म्हणाले, ‘‘राष्ट्रकुल स्पर्धाचा दर्जा खूपच दुय्यम असतो. शासनाने त्यामधील कामगिरीचा विचार केला जाणार नाही असा धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे.’’