‘करायला गेलो एक, पण झाले भलतेच’ अशीच काहीशी अवस्था जगविख्यात सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँग याची होणार आहे. त्याने उत्तेजक औषधे सेवन केल्याची कबुली दिल्यामुळे तो आता अमेरिकन कायद्याच्या कचाटय़ात सापडला आहे. ओपरा विन्फ्री यांनी घेतलेल्या मुलाखतीत आर्मस्ट्राँग याने आपण सायकिलगमधील कामगिरी उंचावण्यासाठी उत्तेजक औषधे नियमित घेतल्याची कबुली दिली होती. उत्तेजक सेवनाच्या आरोपामुळे आर्मस्ट्राँगला टूर डी फ्रान्स शर्यतीची सातही विजेतेपदे गमवावी लागली आहेत. अमेरिकन उत्तेजक प्रतिबंधक समितीने एक हजार पानी अहवाल देत त्याच्यावर उत्तेजक औषधे घेतल्याचे आरोप ठेवले होते, मात्र आतापर्यंत त्याने या गुन्हय़ाची कबुली दिली नव्हती, मात्र विन्फ्री यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्याने उत्तेजक औषधे सेवनप्रकरणी आपण दोषी आहोत असे स्पष्ट केले होते. आर्मस्ट्राँग याने दिलेल्या कबुलीमुळे त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवले जाऊ शकतात. त्याच्याविरुद्ध खटला दाखल करून सखोल तपासणी करणे आता अमेरिकन कायदे विभागास सहज शक्य होणार आहे, असे क्रीडा कायदेतज्ज्ञ ब्रायन सोकोलोव यांनी सांगितले.