उत्तेजक द्रव्यसेवनात दोषी ठरलेल्या लान्स आर्मस्ट्राँगने स्वतंत्ररीत्या टूर डी फ्रान्स सायकल शर्यत सुरू करण्याचा प्रयत्न केला तर त्याला चाहत्यांकडून तीव्र विरोध दर्शविला जाईल, असे आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघाचे (यूसीआय) अध्यक्ष ब्रायन कुकसन यांनी म्हटले आहे. उत्तेजक सेवनामुळे आर्मस्ट्राँगला टूर डी फ्रान्स शर्यतीची सात विजेतेपदे गमवावी लागली आहेत. तो कर्करोगग्रस्तांच्या मदतीसाठी इंग्लंडचा फुटबॉलपटू जिऑफ थॉमस याच्या सहकार्याने या शर्यतीच्या मार्गावर एक दिवसाची शर्यत स्वतंत्ररीत्या सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याबाबत कुकसन यांनी सांगितले, ‘‘आर्मस्ट्राँगने सायकलिंगच्या चाहत्यांची सपशेल फसवणूक केली आहे. त्यामुळे त्याने शर्यत आयोजित केली तर त्यास चाहत्यांकडून तीव्र विरोध सहन करावा लागेल. कर्करोगग्रस्तांसाठी अन्य अनेक मार्गानी निधी उभारणे शक्य आहे, त्यामुळे आर्मस्ट्राँग व थॉमस यांनी सायकल शर्यतीचा विचार सोडून द्यावा.’’