उत्तेजक औषध सेवन केल्यामुळे टूर-डी-फ्रान्स सायकल शर्यतीची सातही विजेतेपदे गमावणारा अमेरिकन सायकलपटू लार्न्‍स आर्मस्ट्राँग हा लवकरच आपल्यावरील आरोपांची जाहीरपणे कबुली देणार असल्याचे समजते.
येथील एका वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे, की सायकलिंगची कारकीर्द पुन्हा सुरू करण्याबाबत तो उत्सुक असून त्या दृष्टीनेच आपल्यावरील आरोपांची कबुली तो देणार आहे. आपल्यावरील आरोपांबाबत तो अमेरिकन उत्तेजक प्रतिबंधक समितीकडे कोणतेही अपील करणार नसल्याचेही समजते. या समितीने आर्मस्ट्राँग याला दोषी ठरविण्यासाठी आपल्याकडे प्रत्यक्षदर्शी, विविध आर्थिक कागदपत्रे, प्रयोगशाळेचे अहवाल आदी सबळ पुरावे असल्याचे सांगितले आहे. त्यामुळेच आर्मस्ट्राँगने अपील करण्याऐवजी आरोप मान्य करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या कारकीर्दीतील विजेतेपदांवर त्याला पाणी सोडावे लागणार आहे, मात्र तहहयात बंदीच्या कारवाईतून त्याची सुटका होईल व अल्पकाळानंतर तो पुन्हा स्पर्धात्मक सायकलिंग करू शकेल अशी आशा त्याला वाटत आहे.  
आर्मस्ट्राँगचा वकील टीम हरमान याने आर्मस्ट्राँग आरोपांची कबुली देणार असल्याचे आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले.