लुकास पोडोलस्कीच्या दोन गोलांच्या बळावर अर्सेनलने वेस्ट हॅम युनायटेडवर ३-१ असा विजय मिळवला. या विजयासह अर्सेनलने इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धेच्या गुणतालिकेत चौथे स्थान पटकावत पुढील वर्षीच्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेसाठी थेट पात्र होण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत.
गेल्या १७ वर्षांत पहिल्यांदाच युरोपमधील अव्वल संघांमधून स्थान गमावण्याचा धोका अर्सेन वेंगर यांच्या अर्सेनलला होता. त्यांना पाचव्या क्रमांकावरील एव्हरटनच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. इंग्लिश प्रीमियर लीगमधील अव्वल चार संघ थेट चॅम्पियन्स लीगसाठी पात्र होतात. त्यामुळे या सामन्यात अर्सेनलला विजयाची आवश्यकता होती.
एमिरेट्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मॅथ्यू जार्विस याने ४०व्या मिनिटाला गोल करीत वेस्ट हॅम युनायटेडला आघाडीवर आणले होते. त्यानंतर काही मिनिटांनी लुकास पोडोलस्कीने गोल करून अर्सेनलला बरोबरी साधून दिली. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच फ्रान्सचा आघाडीवीर ऑलिव्हियर गिरौड याने अर्सेनलला २-१ असे आघाडीवर आणले. अखेरच्या क्षणी पोडोलस्कीने दुसरा गोल करीत अर्सेनलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गेल्या पाच लीग सामन्यांमधील अर्सेनलचा हा पहिला विजय ठरला.