‘..अशा बेताल खेळापेक्षा विलायतेतून आलेल्या पाहुण्या क्रिकेटचा जरू र आदर केला जावा!’.. अशा खोचक शब्दांत लोकमान्य टिळकांनी १९ ऑगस्ट १८९०च्या ‘केसरी’ वृत्तपत्रातील अग्रलेखातून कबड्डीसह एकूण देशी खेळांना चांगलेच झोडपून काढले होते. कबड्डीला इशारेवजा ताकीद देणाराच तो अग्रलेख होता. तत्कालीन परिस्थिती या एका वाक्यातून सहज समजू शकते. अनागोंदी संयोजन, खेळाडूंची बेशिस्त वर्तणूक, हुल्लडबाजी, परस्परातील हाणामाऱ्या हे कबड्डीमधील वास्तव टिळकांनी आपल्या लेखनातून मांडले होते. आज सव्वाशे वर्षांनंतरही कबड्डीचे नेमके हेच वास्तववादी अस्तित्व नाकारता येत नाही.

एकीकडे कबड्डीचा वारसा सांगणारा आणि त्याच्या इतिहासाचा साक्षीदार महाराष्ट्र जागतिक कबड्डीच्या नकाशावर शोधावा लागत आहे, तर भारतीय कबड्डी गेहलोतशाहीच्या जोखडातून सुटकेसाठी आक्रंदन करीत आहे. १९९०ला कबड्डीला आशियाई क्रीडा स्पध्रेचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाले. इथून सुरू झालेला ‘सुवर्ण’प्रवास अद्याप तरी सुरू आहे. २००४ मध्ये पहिली विश्वचषक स्पर्धा झाली आणि त्यानंतर तीनच वर्षांनी दुसरी, पण तिसऱ्या विश्वचषकासाठी कबड्डीला नऊ वष्रे प्रतीक्षा करावी लागली. ही प्रतीक्षा का करावी लागली, याचे उत्तर भारतीय कबड्डीतील कुणीही धुरंधर देऊ शकणार नाही. कबड्डीला ऑलिम्पिकमध्ये पोहोचवू, हे दिवास्वप्न जोपासणाऱ्या या मंडळींनी कबड्डीच्या वाटचालीचा आढावा घेतला तरी हे स्वप्न किती दूर आहे, याची प्रचीती येईल. एका तपापूर्वी झालेल्या पहिल्या विश्वचषकात १२ संघ सहभागी झाले होते आणि आता अहमदाबादला होणाऱ्या विश्वचषकातही सहभागी संघांचा आकडा तेवढाच आहे. मग खरेच कबड्डीचा विकास झाला का? याच गणितीय समीकरणानुसार ऑलिम्पिक म्हणजे ‘दुरून डोंगर साजरे’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

हुतूतू ते कबड्डी या संक्रमणापासून ते खेळाचे आंतरराष्ट्रीय पाऊल, इथपर्यंतच्या साऱ्या प्रवासात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता. कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांनी राजाश्रय मिळवत आपल्या चपला झिजवून हे दिवस कबड्डीला दाखवले. मुरब्बी राजकीय नेते शरद पवार यांनी कबड्डीला सातासमुद्रापार नेले. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संघटनांचे नेतृत्व हिमतीने केले. ही पकड ढिली झाल्यानंतर मातीच्या मैदानांऐवजी मॅटचा प्रभाव वाढत गेला. त्यामुळे एकीकडे कबड्डीमधील सत्तेत महाराष्ट्र  जसा नावाला उरला, तीच गत भारतीय संघामध्येही पाहायला मिळाली.

एकंदरच कबड्डी विश्वात जनार्दनसिंग गेहलोत यांचा एकछत्री अंमल सुरू आहे. ते आंतरराष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष आहेत, तर त्यांच्या पत्नी मृदुल भदोडिया भारतीय हौशी कबड्डी महासंघाचे अध्यक्षस्थान भूषवतात. असा सारा कारभार गेहलोत कुटुंबामार्फत चालतो. आता त्यांचा एक मुलगासुद्धा कबड्डीच्या प्रशासनात

लक्ष घालू लागला आहे. भारतीय संघाची निवड कोणत्या निवड समिती सदस्यांनी केली, या प्रश्नालाही कबड्डीतील राज्यकर्त्यांकडे कोणतेही उत्तर नसते. कारण निवड प्रक्रिया नावाची कोणतीही गोष्ट इथे अस्तित्वातच नाही. बाकी प्रो कबड्डी लीग किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या निमित्ताने गेहलोत कुटुंबीयांचे पर्यटन वर्षभर सुरूच असते.

काही वर्षांपूर्वी समालोचक चारू शर्माच्या सुपीक मेंदूतून साकारलेल्या प्रो कबड्डीला यश मिळाले आणि संघटक, खेळाडू, प्रशिक्षक आदी साऱ्यांना जणू संजीवनीच मिळाली. उत्तरेकडील खेळाडूंचे वर्चस्व तिथेसुद्धा सहज दिसून येते. त्यांच्या खेळातील कौशल्य, तंदुरुस्ती आणि ताकद याकडे मुळीच दुर्लक्ष करून चालणार नाही.

मागील दोन्ही विश्वचषकांत उपविजेतेपद होते इराणला. हाच इराणचा संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला डोईजड ठरला होता. दोन वर्षांपूर्वी जेमतेम सुवर्णपदक वाचवण्यात भारत यशस्वी ठरला होता. प्रो कबड्डीचा अनुभव असलेले मेराज शेख, फझल अत्राचाली आणि हादी ओश्तोरॅकसारखे खेळाडू आपल्या चतुरस्र खेळाने छाप पाडत आहेत. त्यामुळे इराणला कमी लेखून चालणार नाही. सुदैवाने पाकिस्तानचा संघ नसल्यामुळे इराण वगळता उत्तम संघ या स्पध्रेत दिसत नाही. त्यामुळे बाकीच्या देशांचे सामने कितपत प्रेक्षणीय ठरतील, याविषयी साशंका आहे.

महाराष्ट्राच्या कबड्डीविषयी म्हणायचे झाल्यास फक्त  संघ, खेळाडू आणि स्पर्धा यांची मुबलक पिके इथे येतात. मात्र त्यांचा गांभीर्याने वेध घेतल्यास टिळकांच्या अग्रलेखातील वास्तव आजसुद्धा ताजे वाटते. प्रो कबड्डी लीगप्रमाणे आपलीही लीग असावी, अशा  कल्पनेतून महाकबड्डी लीग अस्तित्वात आली. पहिल्या पर्वातच संयोजकांचा आर्थिक डोलारा कोसळल्यानंतर आता दुसरे पर्व हिमतीने सुरू आहे. मात्र ही स्पर्धा आपण लोकांसाठी घेतो, मग त्याचा प्रचार-प्रसार करून खेळ वाढवता येईल, ही गोष्टच या राज्यातील कबड्डी संघटकांना माहीत नाही.

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पाटील प्रो कबड्डीला नाव ठेवायचे. याच लीगमुळे महाराष्ट्राच्या कबड्डीची अधोगती झाली, असे ते म्हणायचे. पण गेल्या काही दिवसांत ते प्रो कबड्डीचे गुणगान गाऊ लागले आहेत. हा त्यांच्यातील बदल कबड्डी क्षेत्रातील जाणकारांच्या नजरेतून सुटलेला नाही. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा जाब महाराष्ट्राशीच नाते सांगणाऱ्या टिळकांनी इंग्रजांना निक्षून विचारला होता. मग महाराष्ट्राचे खेळाडू जर तुम्हाला नकोसे वाटत असतील, तर भारतीय संघाचे व्यवस्थापक पदसुद्धा मी नाकारतो, असा मराठी बाणा पाटील का दाखवत नाहीत? पण त्यांचा राग निषेधाची पत्रके काढण्याइतपत मर्यादित राहिला.

सध्या सुगीचे दिवस अनुभवणारी कबड्डी राष्ट्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर विविध पातळ्यांवर झगडत आहे. हा झगडण्याचा प्रवास हा ज्याचा-त्याचा आहे. ऑलिम्पिकनगरीत प्रदर्शनीय सामन्यांचे आमंत्रण आले आहे, असे सांगून त्यातच रमणाऱ्या भारतीय कबड्डीचा ऑलिम्पिक प्रवास अतिशय दूर आहे, ही वस्तुस्थिती आहे. याचप्रमाणे महाराष्ट्राची कबड्डी खरेच विकसित झाली का, या सर्व गोष्टींचा तथाकथित कबड्डी संघटकांनी विचार केल्यास हा खेळ आपण योग्य पद्धतीने जोपासू शकू. अन्यथा कबड्डी हा कधी तरी आमच्या मातीतला खेळ होता, असे भविष्यात आपल्याला म्हणावे लागेल.

 

– प्रशांत केणी

prashant.keni@expressindia.com