वानखेडे स्टेडिमयवरील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात एकही मुंबईचा खेळाडू भारतीय संघात नाही, या विषयावर बरीच चर्चा झाली. त्यावर वादविवादही रंगले. या साऱ्याची झोड मुंबईच्या स्थानिक क्रिकेटबरोबर संघटनेवरही उठली; पण खरेच तसे आहे का? मुंबईला क्रिकेटची परंपरा आहे. भारतातील क्रिकेटची पंढरी म्हणून मुंबईची ख्याती; पण तरीही मुंबईचा खेळाडू भारतीय संघात नाही, हे शल्य खडूस मुंबईकरांना नक्कीच बोचले असेल. पण असे असले तरी मुंबई क्रिकेट तळागाळाला गेले आहे किंवा मुंबईकडे चांगले खेळाडूच नाहीत, असे होत नाही. मुंबई क्रिकेट कोलमडलेले नाही; पण मुंबईच्या क्रिकेटची अवस्था पूर्वीसारखी चांगली नाही, हेदेखील तेवढेच खरे आहे.

अजिंक्य रहाणे भारतीय संघात होता; पण दुखापतीमुळे त्याला खेळता आले नाही. कदाचित कारण वेगळेही असण्याची शक्यता असू शकते; पण वानखेडेवर पहिल्यांदाच मुंबईकर खेळाडू खेळला नाही. रोहित शर्माला कसोटी संघात स्थान भक्कम करता आलेले नाही. तो रंगात येत असताना दुखापतीमुळे संघाबाहेर पडला. धवल कुलकर्णी एकदिवसीय संघात येऊन-जाऊन असतो. शार्दूल ठाकूरचे संघ व्यवस्थापनाने नक्की काय करायचे ठरवले आहे, ते तेच जाणोत. सारेच अनाकलनीय. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात तो पर्यटकच ठरला. वानखेडेवरच्या सामन्यासाठी त्याला रणजी सामना सोडून बोलावले गेले, पण खेळवले नाही. जर व्यवस्थापनाला खेळवायचे नव्हते, तर हा द्राविडी प्राणायाम कशासाठी?

अजित वाडेकर, सुनील गावस्कर यांच्या काळात भारतीय संघात बरेच मुंबईकर असायचे. त्यानंतर सचिनने २० वर्षे कसोटी संघातील स्थान अबाधित राखले; पण गेल्या दहा वर्षांमध्ये आठवून पाहिले तर सचिन वगळता किती मुंबईच्या खेळाडूंना संघात स्थान बळकट करता आले? बोटावर मोजण्यासारखेच मुंबईचे खेळाडू गेल्या १६ वर्षांमध्ये तरी भारताच्या संघात दिसले. या सामन्यामुळे आपण मुंबईकर खेळाडूंचे संघातील स्थान यावर विचार करताना गेल्या काही वर्षांचा विचार करायला हवा. २०००-०१ साली समीर दिघे आणि साईराज बहुतुले संघात आले. त्यानंतर २००३ साली अविष्कार साळवी आणि २००७ साली रमेश पोवार संघात आला. त्यानंतर थेट रोहित, अजिंक्यच कसोटी संघात दिसले. त्यामुळे गेल्या १६ वर्षांचा विचार केला तर भारतीय संघात हेच सहा खेळाडू मुंबईचे दिसले. सचिन खेळत असताना मुंबईकर संघात नसल्याची जाणीव होत नव्हती. मग आता जी मंडळी ओरड करत आहेत, त्यांनी स्थानिक क्रिकेटची वानवाही पाहायला हवी.

मुंबईने आतापर्यंत ४१ वेळा रणजी करंडक पटकावला. गेल्या वर्षीही तेच जिंकले. मग त्या वेळी किती त्यांचे खेळाडू संघात दिसले. मुंबईचा संघ पूर्वीसारखा एकसंध वाटत नाही, ही गोष्ट जाणकार सांगतात. मुंबईचा संघ तुकडय़ांमध्ये विभागलेला दिसतो. गेल्या वर्षी श्रेयस अय्यर, अखिल हेरवाडकर, सिद्धेश लाड यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. अखिल आणि श्रेयस यांना भारतीय ‘अ’ संघात स्थान दिल्यावर त्यांच्याकडून चांगली कामगिरी झाली नाही. त्यामुळे कदाचित ते निवड समितीच्या नजरेत भरले नसावेत. दुसरीकडे मुंबईचेच माजी राष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील आणि मुंबईची संघटना यांच्यामधून विस्तवही जात नसल्याचे काही जाणकार सांगतात. त्यामुळेच पाटील यांनी जास्त मुंबईच्या खेळाडूंना संधी दिली नाही, असे म्हटले जाते; पण या गोष्टीलाही दोन बाजू आहेत. पाटील यांचा राग जर संघटनेवर असेल तर त्यांनी तो खेळाडूंवर काढणे योग्य नाही, कारण तेदेखील खेळाडूच होते. दुसरी गोष्ट म्हणजे ते मुंबईचे आहेत म्हणून त्यांनी आपल्या स्थानिक खेळाडूंना झुकते माप द्यायला हवे होते, असेही नाही. कदाचित त्यांनी या खेळाडूंना पारखल्यावरच संघात स्थान दिले नसावे; पण मुंबईचा संघ रणजी करंडक जिंकतो तरी त्यांचे खेळाडू भारतीय संघात नाहीत, पण दिल्लीने किती वेळा रणजी कंरडक जिंकला आणि त्यांचे किती खेळाडू भारतीय संघात गेल्या काही वर्षांमध्ये दिसले, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच्या मुंबईच्या खेळाडूंमधला खडूसपणा संपला. त्यामुळे ते जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतात तेव्हा ते बुजलेले आणि बावळे वाटतात. अजिंक्य किंवा धवल त्याचे उदाहरण आहे. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास दिसतच नाही.

जगभरात सर्वात जास्त स्थानिक क्रिकेट आणि स्पर्धा मुंबईत खेळवल्या जातात. त्यासाठी मुंबईची क्रिकेट संघटना मदतही करते; पण फक्त मदत करून त्यांचे काम संपण्यासारखे नाही, कारण मुंबईच्या शालेय क्रिकेटमध्ये बरेच संघ दिसतात. हॅरीस आणि गाइल्स शिल्डमध्ये हजारो विद्यार्थी खेळतात, पण हेच खेळाडू विद्यापीठ क्रिकेटमध्ये खेळताना दिसत नाहीत. याची कारणे संघटनेला शोधता आलेली नाहीत. शालेय क्रिकेटमध्ये ठरावीक संघच जिंकताना दिसतात. त्यांच्या खेळाडूंच्या वयोमर्यादेचा साराच घोळ आहे. संघटनेने याबद्दलही ठोस पाऊल उचललेले आणि त्याबाबतची अंमलबजावणी केलेलीही दिसत नाही. महाराष्ट्राबाहेरची मुले आणून त्यांचे वय लपवून स्पर्धामध्ये खेळवणाऱ्या प्रशिक्षकांमधील भामटय़ांना संघटना ओळखत नाही का? त्यांच्यावर कोणती कारवाई केली गेली? मुंबई क्रिकेटच्या बहरलेल्या कल्पवृक्षाच्या मुळाला लागलेली कीड आताच नष्ट करायला हवी.

गेल्या १६ वर्षांमध्ये मुंबईच्या खेळाडूंना भारतीय संघाने बऱ्याचदा हुलकावणी दिली आहे. या गंभीर समस्येने बऱ्याचदा मुंबई क्रिकेटचे दार ठोठावले आहे. आता सचिनच्या जाण्यानंतर मोठा धक्का मुंबईला जाणवत आहे. क्रिकेटच्या प्रसारामुळे पूर्वीसारखे ७-८ मुंबईचे खेळाडू संघात दिसणे कठीणच आहे. त्याची अपेक्षा ठेवणे अव्यवहार्य ठरेल. ही समस्या गंभीरतेने घेऊन त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. अजूनही उशीर झालेला नाही; पण दुरुस्तीची ही संधी गमावली तर मुंबई क्रिकेटच्या वर्तमान आणि भविष्यावर भूतकाळाचीच छाया गडद होऊन बसेल.

प्रसाद लाड

prasad.lad@expressindia.com