रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेत मुंबईचा एक वेगळा रुबाब असतो. त्यामुळेच उपविजेतेपदसुद्धा मुंबई क्रिकेटला पचनी पडत नाही. यंदाच्या हंगामात मुंबईकर फलंदाज सातत्य दाखवण्यात अपयशी ठरले. याचप्रमाणे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यातील कमकुवतपणा यंदा प्रकर्षांने दिसून आला. यात विकास करण्याची आवश्यकता आहे, असे मुंबईचे आजी-माजी प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी सांगितले. मुंबईच्या यंदाच्या रणजी स्पध्रेतील कामगिरीचे या दिग्गजांनी केलेले विश्लेषण-

 

पुनरावलोकनाची आवश्यकता – दिलीप वेंगसरकर,भारताचे माजी कर्णधार

आंतरराष्ट्रीय खेळाडू अनुपलब्धच असतील, हे गृहीत धरूनच मुंबईचा संघ बांधावा लागतो. सकारात्मक दृष्टीने विचार केल्यास ही अन्य खेळाडूंसाठी संधी असते आणि ती कशी तुम्ही मिळवता, हे महत्त्वाचे असते. वर्षांनुवष्रे आंतरराष्टीय खेळाडू क्वचितच उपलब्ध होतात. त्यांच्याशिवायच मुंबईने हे कामगिरीतील सातत्य टिकवून ठेवले आहे. मुंबईचा संघ अंतिम फेरीत जरी हरला, तरी अपयशी असा शिक्का बसतो. युवा खेळाडूंना मुंबईचा इतिहास आणि परंपरा माहीत आहे, ते याच धर्तीवर संघाची कामगिरी कायम ठेवत आहेत. चांगले खेळाडू हे मुंबईत घडतच राहणार. कारण येथील क्रिकेटची प्रणाली ही उत्तमपणे रुजलेली आहे. मुंबईत मुबलक स्पर्धाचे वातावरण आहे, असे कुठेच आढळत नाहीत. लहान वयोगटातील मुलांसाठी विविध वयोगटांच्या स्पर्धाप्रमाणे आंतरशालेय, हॅरिस-गाइल्स या उपलब्ध आहेत. याचप्रमाणे गेल्या वर्षीपासून १२ वर्षांखालील स्पर्धाही सुरू झाली आहे. याशिवाय आंतरविद्यापीठ, आंतरकार्यालय, आंतरक्लब या स्पर्धा उपलब्ध असल्यामुळे खेळाडू या अनुभवांतून तावूनसुलाखूनच बाहेर पडतो. अन्य राज्यांच्या तुलनेत गुणवत्ता विकासाचे मोठे व्यासपीठ मुंबईत उपलब्ध आहे. परंतु गोलंदाज घडण्यासाठी अजून मेहनत घ्यायला हवी. वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज याचा विचार केल्यास मुंबई पिछाडीवर असल्याचे दिसून येते. गोलंदाज तयार होण्यासाठी विशेष शिबिरे घेण्याची आवश्यकता आहे. यंदा त्रयस्थ ठिकाणी रणजी स्पर्धा घेण्याचा प्रयत्न हा सपशेल फसला आहे. यात बदल होण्याची नितांत आवश्यकता आहे.

 

अडचणींतून मिळवलेले उपविजेतेपदसुद्धा मोलाचे – चंद्रकांत पंडित, मुंबईचे प्रशिक्षक

गेल्या वर्षी आपण रणजी करंडक जिंकला होता. यंदाच्या हंगामाची सुरुवात करताना तशीच अपेक्षा होती. त्यानुसार हंगामाचा प्रारंभसुद्धा चांगला झाला होता. संघातील सर्वच खेळाडू उत्तम फलंदाजी करतील, अशी आम्हाला आशा होती. पण तसे घडले नाही. प्रत्येक सामन्यात आदित्य तरे, अभिषेक नायर, सूर्यकुमार नायर, सिद्धेश लाड यापैकी कुणाची तरी फलंदाजी बहरली आणि आम्ही सामने जिंकत गेलो. यातूनच आत्मविश्वास वाढत गेला. गोलंदाजीतसुद्धा सातत्याचा अभाव दिसून आला. धवल कुलकर्णी कमी काळ उपलब्ध होता. याशिवाय दुखापतींचे आव्हानसुद्धा आम्हाला पेलावे लागले. श्रेयस अय्यरलासुद्धा काही काळ दुखापत झाली होती. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे हे आंतरराष्टीय दर्जाचे खेळाडू आम्हाला उपलब्धच झाले नाहीत. एका वेळी सर्व खेळाडू उपलब्ध होते आणि त्यांचा सांघिक खेळ बहरणे, असे या हंगामात दिसून आले नाही. या अडचणींवर मात करीत आम्ही अंतिम फेरीपर्यंत पोहोचणे, हे कौतुकास्पद होते. तामिळनाडूविरुद्धच्या मुंबईच्या कामगिरीचे मात्र नक्की कौतुक करेन. यानंतर गुजरातला दिलेली लढत हीसुद्धा मुंबईच्या ‘खडूस’पणाची ग्वाही देणारी होती. आता सर्वच राज्यांचा खेळ विकसित झाला आहे. फलंदाजी समर्थपणे न आकारणे आणि मोक्याच्या क्षणी सोडलेले झेल या दोन गोष्टींच्या उणिवा दिसून आल्या. अंतिम सामन्यात पार्थिव पटेलने कणखर नेतृत्वाचे प्रदर्शन करताना संघाला जिंकून दाखवले. नायरने आपल्या गोलंदाजीनेसुद्धा संघाला अनेकदा तारले. यंदाच्या हंगामात पृथ्वी शॉसारखा गुणी फलंदाज गवसला आहे. पण आणखी विकसित होण्यासाठी त्याने मेहनत घेण्याची आवश्यकता आहे.

 

गोलंदाजीत सुधारणेला वाव  – सुलक्षण कुलकर्णी, छत्तीसगढचे प्रशिक्षक

मुंबईचा संघ सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत पोहोचणे, हे यश स्पृहणीय आहे. भारतामध्ये जे २८ रणजी संघ आहेत, त्यापैकी सर्वात सातत्यपूर्ण खेळ हा मुंबईकडून होतो आहे. उपविजेतेपद गाठणे, हेसुद्धा मोठे यश असल्याचे मी मानतो. यंदाच्या हंगामाकडे पाहिल्यास गुजरातच्या कामगिरीत मुंबईपेक्षा अधिक सातत्य असल्याचे सहज अधोरेखित होते. यासोबत सांघिक समतोल आणि आक्रमकता गुजरातच्या संघात प्रकर्षांने जाणवत होती. साखळीतसुद्धा गुजरात-मुंबई लढत झाली होती आणि त्या सामन्यात गुजरातचा संघ वरचढ ठरला होता. उपांत्य सामन्यात पहिल्या डावात पिछाडीवर पडूनही निर्णायक विजयाची किमया त्यांनी साधली होती. त्यामुळे योग्य संघ जिंकला, असे मी म्हणेन. अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा यांची अनुपस्थिती मुंबईला अजिबात भेडसावली नाही. कारण हे तारांकित खेळाडू उपलब्ध नसणार, हे गृहीत धरूनच मुंबईचा संघ खेळत असतो. खूप वर्षांपूर्वी सुधीर नाईक यांच्या नेतृत्वाखाली अतिशय युवा संघ जिंकला होता. अभिषेक नायर हा लढवय्या अष्टपैलू खेळाडू आहे. कठीण काळात त्याची कामगिरी अधिक बहरते, हेच त्याने गेली अनेक वष्रे सिद्ध केले आहे. सामने जिंकण्यासाठी वीस बळी घेणाऱ्या गोलंदाजांची गरज लागते. त्यामुळे मुंबईला गोलंदाजी सुधारण्याची आवश्यकता आहे, हे मात्र नक्की सांगेन.

 

क्षेत्ररक्षणाचा स्तर सुधारण्याची गरज  – प्रवीण अमरे, मुंबईचे माजी प्रशिक्षक

गेल्या वर्षी विजेतेपद आणि यंदा उपविजेतेपद ही मुंबईची कामगिरी आहे, परंतु तमाम मुंबईकरांना फक्त आपला संघ विजेता व्हावा, हीच इच्छा असते. पण मुंबईची परंपरा अतिशय मोठी असल्यामुळे उपविजेतेपद हे समाधान देणारे नसते. आपण इथपर्यंत मजल मारली, म्हणजे संघाची कामगिरी नक्की चांगली झाली असे म्हणता येईल. परंतु अंतिम सामन्याचा विचार केल्यास गुजरातच्या संघाचे आणि विशेषत: पार्थिवचे कौतुक करायला हवे. जसप्रित बुमराहसुद्धा त्यांना फार काळ उपलब्ध नव्हता. त्यांच्या कारकीर्दीतील हे ऐतिहासिक विजेतेपद मुंबईसारख्या कडव्या संघाला हरवून मिळवले. मुंबईचा संघ जिंकतो, तेव्हा प्रमुख चार फलंदाजांचे सातत्य असणे आवश्यक असते. ते दिसून आले नाही. पृथ्वी शॉ याने मात्र संधीचे सोने केले. परंतु ढिसाळ क्षेत्ररक्षण हे सुधारण्याची आवश्यकता प्रकर्षांने जाणवते. हे चांगले असते, तर अंतिम सामन्याचा निकालसुद्धा कदाचित वेगळा असता. अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा उपलब्ध असणे आवश्यक होते. धवल कुलकर्णी आणि अखिल हेरवाडकर हेसुद्धा अधिक काळ संघात असायला हवे होते.

(संकलन : प्रशांत केणी)