टेनिस हाच त्याचा ध्यास. विविध स्पर्धाच्या निमित्तानं जगभर जाणं आणि जेतेपद पटकावणं, हा त्याचा अपेक्षित दिनक्रम. तो भ्रमंती करत असे; पण जेतेपदाचा चषक उंचावण्याऐवजी भलतंच घडत असे. खेळता-खेळता एखादा अवयव असहकार पुकारे आणि त्याला थेट माघार घ्यावी लागे. प्रतिस्पध्र्याची सुसाट सíव्हस परतवताना अचानकच त्याचा दमसास पुरत नसे. चेंडूपर्यंत पोहोचता-पोहोचता पोटऱ्यांमध्ये अनामिक कळ जाई आणि पाय बधिर होऊन जात. हे नेमकं काय घडतंय, या हेतूनं त्यानं ‘स्व’चा शोध घ्यायला सुरुवात केली. स्वत:चं शरीर, त्याचा ठहराव, स्पंदनं टिपल्यानंतर त्यानं स्वत:मध्ये आमूलाग्र बदल केला. आहारापासून आचारविचारांपर्यंत प्रत्येक गोष्ट निरखून घेतली. यंदाच्या वर्षांत त्यानं कळसाध्याय गाठला. वर्षभरात ११ जेतेपदांसह त्याची ८२-६ ही जयपराजयांची आकडेवारी अचंबित करणारी आहे. महानतेच्या बिरुदावलीला सातत्याचं कोंदण जोडल्यामुळे तो यंदाच्या हंगामाचा राजा ठरला. तोळामासा प्रकृतीतून कणखर व्यावसायिक टेनिसपटू घडवणाऱ्या त्या किमयागाराचं नाव आहे नोव्हाक जोकोव्हिच.

 आहारमंथन
पाच वर्षांपूर्वी डेव्हिस चषकात जोकोव्हिच सर्बयिाचे प्रतिनिधित्व करणार होता, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यानं डॉ. इगोर केटजोव्हिक यांचा सल्ला घेतला. निष्णात आहारतज्ज्ञ असणाऱ्या केटजोव्हिक यांनी जोकोव्हिचकडून पाव हातात घेऊन काही व्यायाम प्रकार करवून घेतले. यातूनच जोकोव्हिचच्या मार्गातल्या अडथळ्याची त्यांना माहिती झाली. ग्लुटेन म्हणजे चिकट स्वरूपाचं प्रथिनांचं मिश्रण जे प्रामुख्याने गहू, पाव, मदा यांच्यात आढळतं. जोकोव्हिचला या ग्लुटेनची अ‍ॅलर्जी असल्याचं स्पष्ट झालं. जोकोव्हिचच्या वडिलांचा सर्बयिात पिझ्झा हॉटेलचा व्यवसाय आहे- साहजिकच पिझ्झा, पाव आणि बेकरी उत्पादित वस्तूंचा आहारात सहजतेनं वापर होत असे. इतरांना पौष्टिक असणारे हे प्रथिन जोकोव्हिचच्या शरीराला मात्र कूर्मगती बनवतं. अमलात आणायला कठीण असलं तरी यशोशिखराच्या वाटचालीत अडसर असल्यानं जोकोव्हिच आता संपूर्ण आहार ग्लुटेनविरहित घेतो. यशाचा मार्ग पोटातून जातो, या उक्तीबरहुकूम आपण काय खात आहोत, याबाबत जोकोव्हिच सदैव जागरूक असतो. ज्या हॉटेल्समध्ये अभ्यागतांना स्वयंपाकघर वापरण्याची परवानगी आहे अशाच हॉटेलात जोकोव्हिच राहतो. बहुतांशी वेळी स्वत:चे जेवण तो स्वत: तयार करतो. सेंद्रिय शेतीतून उत्पादित भाज्या, फळांवर त्याचा भर असतो. सहा ग्लास कोमट पाणी आणि दोन मोठे चमचे मध यांनी जोकोव्हिचच्या दिवसाची सुरुवात होते. दीड तास सरावानंतर जोकोव्हिच दणकट न्याहरी करतो. ताजी फळं, ओट्स, शहाळ्याचं पाणी, बदाम-अक्रोड-शेंगदाणे यांचा समावेश असतो. मात्र पाव-चीज-चॉकलेट कटाक्षानं वज्र्य असतं. शरीराला सतत इंधन मिळत राहावं, यासाठी दिवसातून जोकोव्हिच पाच वेळा खातो. यापकी एकदा मांसाहार असतो. उकडलेल्या भाज्या, सोयाबीन, मसूर यांवर त्याचा भर असतो. आपल्या संस्कृतीप्रमाणेच जोकोव्हिच जेवणापूर्वी प्रार्थना करतो. अन्नदात्या शक्तीला वंदन केल्यानंतर प्रत्येक घास शांतपणे चावत जोकोव्हिच जेवतो. विशेष म्हणजे खाताना टीव्ही, भ्रमणध्वनी, संगणक किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर तो करत नाही.

 निद्रा नियोजन
आडनिडय़ा वेळापत्रकामुळे सलग झोप, ही सामान्य माणसासाठी दुर्मीळ गोष्ट झाली आहे. पण सव्वा वर्ष जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला जोकोव्हिच रोज सलग आठ तास झोपतो. नव्या दिवशी, नवी आव्हानं पेलण्यासाठी शरीराला विश्रांती मिळणे आवश्यक आहे हे जाणून जोकोव्हिचनं हा निर्णय घेतला आहे. जेटलॅगसारखा त्रास असेल तर या झोपेचं प्रमाण आणखी वाढतं. टेनिस कोर्टवर जोकोव्हिच सदैव चपळ, उत्फुल्लित का दिसतो, याचं रहस्य या विश्रांतीत दडलंय.

 योग आणि ‘ताई ची’
जोकोव्हिचला अनेक वर्ष दम्याचा त्रास होता, आजही आहे; मात्र त्याची तीव्रता कमी झाली आहे. नाकावरच्या शस्त्रक्रियेनंतर श्वसन नियंत्रण आणि एकाग्रतेसाठी जोकोव्हिच रोज किमान अर्धा तास योग आणि ध्यानधारणा करतो. तंदुरुस्ती आणि चिवटपणासाठी जोकोव्हिच चीनच्या संस्कृतीतील ‘ताई ची’ या कौशल्याचा सराव करतो.

 तंत्रशुद्ध सराव
शरीरातल्या अतिरिक्त कॅलरीज खर्च होतील अशा एका यंत्राच्या माध्यमातून जोकोव्हिच व्यायाम करतो. ७५ हजार अमेरिकन डॉलर्स एवढय़ा रकमेचं हे अंडय़ासारखं दिसणारं यंत्र आहे. सीव्हीएएस कंपनीनं हा फिटनेस पॉड तयार केला आहे. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी संगणकाधारित लहरी शरीरावर सोडण्याची व्यवस्था या यंत्रात आहे. पाच सेट चालणाऱ्या लढतीत जेवढी ऊर्जा खर्च होते, तितका घाम या यंत्राच्या माध्यमातून गाळता येतो. हे यंत्र वापरताना एटीपीच्या नियमांचा भंग होत नाही ना, याची खातरजमा जोकोव्हिचनं करून घेतली आहे.

बेकर आणि मंडळी
साधारण सव्वा वर्षांपूर्वी जोकोव्हिचने महान खेळाडू बोरिस बेकरला प्रशिक्षक म्हणून आपल्या ताफ्यात दाखल केलं. भिन्न संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीशी जुळवून घेणं कठीण होतं. त्यात बेकर स्वत: महान खेळाडू आहे. या दोघांची भट्टी जमायला वेळ लागला, मात्र जोकोव्हिचला मानसिकदृष्टय़ा कणखर करण्यात बेकरचा सिंहाचा वाटा आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या महत्त्वाच्या लढतीत कच खाणाऱ्या, एकाग्रता भंगणाऱ्या जोकोव्हिचला नियंत्रणात ठेवण्याचा फॉम्र्युला बेकरला गवसला आहे. बेकरच्या बरोबरीने सहा जणांचा चमू जोकोव्हिचचे डावपेच, वेळापत्रक ठरवतो.

अफलातून ऊर्जा, कोर्टवरचा सर्वागीण वावर, शेवटच्या गुणापर्यंत झुंजण्याची जिद्द, स्वत:च्या आणि प्रतिस्पध्र्याच्या खेळाचा केलेला सखोल अभ्यास, विभिन्न वातावरणाशी जुळवून घेण्याची हातोटी यांच्यासह दिवसभरात केलेली विचारपूर्वक प्रत्येक कृती यांच्या बळावर जोकोव्हिचनं यंदाच्या वर्षांत अविश्वसनीय वर्चस्व गाजवलं. लष्करी शिस्तीप्रमाणे काटेकोर आणि यंत्रमानवासदृश गोष्टी का करायच्या याचं साधं उत्तर जोकोव्हिच देतो. मला शिखर दिसत होतं, ते गाठण्याची माझ्यात क्षमता आहे याची जाणीव होती. पण शरीर साथ द्यायचं नाही. या पंगूपणाचं वैषम्य वाटायचं, म्हणूनच शरीराची साथ कशी लाभेल, यादृष्टीने विचार केला आणि स्वत:ला बदललं. गेल्या दीड वर्षांत जोकोव्हिचला जिंकण्यासाठी सबळ निमित्तही मिळालंय- दीड वर्षांचा स्टीफन. ‘मला बाप बनवणाऱ्या त्या निरागस चेहऱ्यासाठी जग जिंकावं असं वाटतं,’ असं जोकोव्हिच वारंवार सांगतो. एका हंगामात निर्वविाद वर्चस्व गाजवणाऱ्या जिमी कॉनर्स, जॉन मॅकेन्रो, रॉजर फेडरर, राफेल नदाल, मार्टनिा नवरातिलोव्हा, स्टेफी ग्राफ या दिग्गजांच्या पंक्तीत त्याने स्थान पटकावले आहे. गुणवान मात्र आजारी, अशक्त अशा वर्णनातून जगातला सर्वोत्तम तंदुरुस्त क्रीडापटू ही किमया साधणारा जोकोव्हिच किमयागारच!

यंदाची कामगिरी

1

2

– पराग फाटक