खेळाडूंना आपली अचूक वेळ निश्चित कळावी यासाठी यंदाही पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीत सहभागी होणाऱ्या धावपटूंना ‘टाईम चीप’ ची सुविधा दिली जाणार आहे.
ही शर्यत दोन डिसेंबर रोजी होणार असून त्यामध्ये परदेशातील सव्वाशेपेक्षा जास्त खेळाडूंनी प्रवेश निश्चित केला आहे. या खेळाडूंबरोबरच पुरुष पूर्ण मॅरेथॉन, महिला व पुरुष अर्धमॅरेथॉन तसेच १० किलोमीटर अंतराच्या शर्यतीत सहभागी झालेल्या खेळाडूंना ‘टाईम चीप’ ची सुविधा मिळणार आहे. आरपी स्पोर्ट्स कंपनीने या पर्यावरणपूरक चीप्स पुरविल्या आहेत. या चीप्सचा उपयोग झाल्यानंतर ती टाकल्यानंतर त्यामधून किरणोत्सर्ग होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. ‘टाईम चीप’ मुळे प्रारंभ रेषेपासून अंतिम रेषेपर्यंतचे अंतर कापण्यासाठी नेमका किती वेळ लागला याची माहिती त्वरित उपलब्ध होणार आहे. साधारणपणे तीन हजार धावपटूंना या चीप्सचा लाभ घेता येणार आहे. शर्यतीमधील खेळाडूंच्या कामगिरीची अद्ययावत माहिती घेण्यासाठी तीन हजार मोबाईल्सचा उपयोग केला जाणार आहे. त्याकरिता क्रोनो ट्रॅक लाईव्ह तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. शर्यतीत भाग घेण्याची मदत २४ नोव्हेंबपर्यंत वाढविण्यात आली आहे.