यंदाच्या वर्षाच्या सुरूवातीला ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेला अनुभवी गोलंदाजी आशिष नेहरा आता देशाच्या एकदिवसीय संघात पुनरागमनासाठी उत्सुक आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषकावेळी भारतीय संघात आशिष नेहरा याचा समावेश करण्यात आला होता. नेहराने विश्वचषकादरम्यान उल्लेखनीय कामगिरी केलीच, पण त्याच्या अनुभवाचाही भारतीय संघाला फायदा झाला. संघातील गोलंदाजांना नेहराने दिलेले सल्ले उपयुक्त ठरताना दिसले. त्यामुळे ३७ वर्षीय नेहरा ट्वेन्टी-२० पाठोपाठ एकदिवसीय संघात देखील पुनरागमन करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. पण दुखापतीमुळे सर्वांचीच निराशा झाली.

वाचा: पदार्पणापेक्षा पुनरागमन कठीण-नेहरा

माझ्यावर अलीकडेच दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत माझा रितसर सराव देखील सुरू होता. पण चिकनगुनीया झाल्याने पुन्हा एकदा पदरी निराशा पडली. सप्टेंबर महिन्यात माझी तब्येत खालावली होती. सध्या माझ्या तब्येतीत सुधारणा होत असून सराव देखील सुरू केला आहे. डिसेंबरपर्यंत मी पूर्वीसारखा सज्ज होईन अशी आशा आहे, असे आशिष नेहराने ‘टाईम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितले.
जानेवारी महिन्यापर्यंत पूर्णपणे फिट होऊन इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेसाठी संघात पुनरागमन करण्याचे लक्ष्य असल्याचेही नेहरा पुढे म्हणाला. ट्वेन्टी-२० सामने मी खेळत असलो, तरी एकदिवसीय सामन्यांसाठीही मी सज्ज आहे. संघाला माझी गरज वाटली तर देशाकडून खेळण्याचा मला अभिमान असेल, असे नेहराने सांगितले.