विराट कोहली आणि आशिष नेहरा पैसा खर्च करत नाहीत, असे सांगणाऱ्या युवराजची नेहरानं पोलखोल केली. गौरव कपूरच्या ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या टॉक शोमध्ये नेहरा सहभागी झाला होता. यावेळी गौरवने तू कंजूष असल्याचे पाहिलं नाही, पण त्याबद्दल तू फारच लोकप्रिय आहेस, असे म्हणत कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी स्वत:ची बाजू मांडताना नेहरा म्हणाला की, जो चोर असतो तो न विचारता मी चोरी नाही केली, असे सांगतो. मी कंजूष असल्याचा सर्वाधिक प्रसार हा युवराजने केला. त्यामुळे तुम्ही समजून घ्या की, तो काय असेल, असे म्हणत त्यानं नाव न घेता युवी कंजूष असल्याचे म्हटले.

‘रेडिओ मिर्ची’ कार्यक्रमात युवराजने सध्याचा कर्णधार आणि आपला सहाकारी विराट कोहली कंजूष असल्याचे म्हटले होते. विराटसोबत असेल तर त्याचे बिल मलाच द्यावे लागते. त्याला पैसा खर्च करायला लावणे, फारच कठीण काम असते, असे युवराज म्हणाला होता. याच कार्यक्रमात त्याने नेहराच्या कंजूषपणाचा किस्सा देखील सांगितला होता. युवराज म्हणाला होता की, नेहरा साधा आणि सरळ आहे. पण पैसे खर्च करण्यात तो हात आखडता घेतो. पत्नी आणि मुलांची माझ्यावर जबाबदारी आहे, असे सांगत नेहरा कंजूषपणा करायचा, असे युवराजने या कार्यक्रमात सांगितले होते.

भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज आशिष नेहराला दुखापतीमुळे अनेक सामन्याला मुकावे लागले. गौरवसोबतच्या कार्यक्रमात त्याने आपल्यावर तब्बल १२ शस्त्रक्रिया झाल्याचे सांगितले. आशिष नेहराने २४ फेब्रुवारी १९९९ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून भारतीय संघात पदार्पण केले. यावर्षी फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळवण्यात आलेल्या टी-२० सामन्यात नेहरा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते.