बंगाल-ओदिशा लढतीत दोन दिवसांत ४० बळी
एकसुरी क्रिकेटला आमंत्रण देणाऱ्या पाटा आणि शुष्क खेळपटय़ा तयार करण्याच्या धोरणावर वाद पेटलेला असतानाच रणजी क्रिकेट स्पर्धेतील बंगाल आणि ओदिशा यांच्यातील लढत दीडच दिवसांत आटोपल्याने नव्या वादाला तोंेड फुटले आहे.
पश्चिम बंगालमधील नादिआ येथे झालेल्या लढतीत बंगालचा पहिला डाव १४२ धावांत आटोपला. प्रत्युत्तरादाखल खेळताना ओडिशाचा डाव १०७ धावांत गडगडला. दुसऱ्या डावातही बंगालची घसरगुंडी सुरुच राहिली आणि त्यांचा डाव १३५ धावांत संपुष्टात आला. ओदिशाला विजयासाठी १७० धावांचे लक्ष्य मिळाले मात्र त्यांचा ३७ धावांतच खुर्दा उडाला. अशोक दिंडाने १९ धावांत ७ बळी मिळवले. या मानहानीकारक पराभवानंतर ओडिशा संघाने खेळपट्टीवर नाराजी व्यक्त करत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) रीतसर तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे बंगाल क्रिकेट अकादमीच्या या मैदानावरील ही पहिलीच प्रथम श्रेणी लढत होती.
खेळपट्टीवर नाराजी व्यक्त करत ओडिशा संघाचा कर्णधार नटराज बेहेरा आणि ओडिशा क्रिकेट असोसिएशनचे (ओसीए) सचिव असिर्बाद बेहेरा यांनी बीसीसीआयकडे तक्रार दाखल केली आहे. ओसीएचे सचिव असिर्बाद यांनी सांगितले की, ‘‘ प्रथम श्रेणी क्रिकेटसाठी अशा प्रकारची खेळपट्टी तुम्ही तयार करता? दीड दिवसांत निकाल लावणारी खेळपट्टी बनवल्यानंतरोार दिवसांचा सामना खेळवण्याचा काय अर्थ राहतो. या खेळपट्टीमुळे आम्ही अत्यंत निराश झालो आहोत. आम्ही सामना अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे आणि त्याची एक प्रत बीसीसीआयच्या मैदान समितीचे प्रमुख दलजित सिंग यांनाही पाठवणार आहोत.’’ ओडिशाचा कर्णधार नटराजनेही बीसीसीआयकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. ‘‘पहिल्या दिवसापासूनच खेळपट्टीने आपले स्वरुप दाखवले होते. ती खेळण्यायोग्य नव्हतीच. पहिल्या दिवशी बंगालच्या दोन फलंदाजांच्या शिरस्त्राणावर चेंडू आदळला, तर ओडिशाचा अनुराग सारंगी यालाही तोच अनुभव आला. फ्रंट फूटवर खेळण्यासाठी फलंदाज घाबरत होते.’’
बंगालचे प्रशिक्षक साईराज बहुतुले यांनी मात्र खेळपट्टी दोन्ही संघांसाठी समान होती, असे सांगून ओडिशाच्या नाराजी चुकीची असल्याचे सांगितले. ‘‘या खेळपट्टीचा तुम्ही कसा वापर करता, यावर सामन्याचा निकाल अवलंबून होता. आम्ही ओडिशापेक्षा खेळपट्टीचा चांगला वापर केला. माझ्या कारकीर्दीत याहून अधिक खराब खेळपट्टींवर खेळलो आहे. त्यामुळे या खेळपट्टीबाबत तक्रार करण्याची आवश्यकता नाही.’’