लॉर्ड्स कसोटीत विजयानंतर भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यात मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागते आहे. मात्र या दु:ख मालिकेत अश्विनच्या रूपाने भारतीय संघाला सुवार्ता मिळाली आहे. मँचेस्टर कसोटीत अंतिम अकरात संधी मिळालेल्या रविचंद्रन अश्विनने आयसीसीच्या कसोटी अष्टपैलू क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
पहिल्या तीन कसोटींत अश्विनला संघात स्थान मिळू शकले नव्हते. मँचेस्टर कसोटीत रोहित शर्माच्या जागी रविचंद्रन अश्विनला संघात समाविष्ट करण्यात आले. गोलंदाजीत तो आपली कमाल दाखवू शकला नाही; मात्र फलंदाजी करताना त्याने पहिल्या डावात ४०, तर दुसऱ्या डावात ४६ धावांची खेळी केली होती. या प्रदर्शनाच्या जोरावर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याने थेट अग्रस्थान पटकावले आहे. ३७२ गुणांसह अश्विनने दक्षिण आफ्रिकेच्या व्हरनॉन फिलँडरला मागे टाकले. फिलँडर दुसऱ्या, तर बांगलादेशचा शकीब उल हसन तिसऱ्या स्थानी आहे.
 द्विशतकी खेळीसह श्रीलंकेच्या पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विजयात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या कुमार संगकाराने फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान ग्रहण केले आहे. २००७ आणि २०१२ नंतर क्रमवारीत अव्वल स्थान गाठण्याची संगकाराची ही तिसरी वेळ आहे. ८१ कसोटी आणि ६७१ दिवस संगकारा अग्रस्थानी राहिला आहे. शेवटची कसोटी मालिका खेळणारा महेला जयवर्धने १४व्या स्थानी स्थिर आहे. निराशाजनक कामगिरी करणारा भारताचा चेतेश्वर पुजाराची १२व्या, तर विराट कोहलीची २०व्या स्थानी घसरण झाली आहे.
गोलंदाजांमध्ये जेम्स अँडरसनने पाचव्या, तर मँचेस्टर कसोटीचा सामनावीर स्टुअर्ट ब्रॉडने नवव्या स्थानी आगेकूच केली आहे. १३व्या स्थानी असलेला अश्विन क्रमवारीतील सर्वोत्तम स्थानी असलेला भारतीय गोलंदाज आहे.