श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत तब्बल २१ विकेट्स घेऊन फिरकीपटू आर.अश्विनने आपल्या गोलंदाजीचीने सर्वांनी मने जिंकेली. तसेच महत्त्वाच्या क्षणी मैदानात तग धरून आपल्या फलंदाजीचेही कौशल्य अश्विनने दाखवून दिले. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढून संघासाठी विजयी श्री खेचून आणणारा हा पठ्ठया आता माजी क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवागचा विक्रम मोडीस काढणार आहे. श्रीलंका दौऱयात अश्विनला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्कारासह अश्विनच्या खात्यात आता चार मालिकावीराचे पुरस्कार जमा झाले आहेत. सर्वाधिक मालिकावीराचा पुरस्काराचा मान पटाविण्याचा विक्रम सचिन आणि सेहवाग या भारतीय संघाच्या माजी धडाकेबाज सलामीवीरांच्या नावावर आहे. सचिन आणि सेहवाग यांनी प्रत्येकी पाच वेळा सलामीवीराचा पुरस्कार पटाकावला आहे. सचिनने त्याच्या कारकीर्दीत ७४ कसोटी मालिकांच्या २०० सामन्यांमध्ये ५ वेळा मालिकावीराच्या किताबाचा मानकरी ठरला आहे. तर सेहवागने देखील ३९ कसोटी मालिकांच्या १०४ सामन्यांमध्ये ५ वेळा मालिकावीराचा मान पटकावला. त्यामुळे सचिन-सेहवाग यांचा विक्रम मोडीस काढण्यापासून अश्विन केवळ एक पाऊल दूर आहे.
अश्विनने आजवर ११ कसोटी मालिकेत २८ सामने खेळून चारवेळा मालिकावीराचा पुरस्कार मिळवला आहे.
आगामी काळात भारतीय संघाची कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेविरोधात आहे. त्यामुळे या मालिकेत आर.अश्विन पुन्हा एकदा दमदार कामगिरी करून मालिकावीराचा मान पटकावणार का? याकडे क्रिकेट जगताचे लक्ष असणार आहे.