संघातील सर्वात अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला अंतिम अकरातून वगळण्याचा निर्णय
अयोग्य असल्याची टीका न्यूझीलंडचे ज्येष्ठ क्रिकेटपटू मार्टिन क्रो यांनी केली आहे.  
‘‘कर्णधार महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली व चेतेश्वर पुजारा यांच्याखालोखाल अश्विनला संघात स्थान आहे. असे असूनही त्याला विश्रांती देण्याचा निर्णय चुकीचा आहे हे पहिल्या कसोटीत दिसून येत आहे. इंग्लंडविरुद्ध वर्चस्व गाजविण्याची हुकमी संधी भारताला होती. मात्र अंतिम संघ निवडताना योग्य काळजी घेण्यात आली नाही. रवींद्र जडेजा किंवा स्टुअर्ट बिन्नी यांच्याऐवजी अश्विनला प्राधान्य देण्याची आवश्यकता होती. खरेतर फिरकी गोलंदाज हे कोणत्याही खेळपट्टीवर भारताचे हुकमी अस्त्र आहे. तथापि, ही गोष्ट भारतीय संघ व्यवस्थापन विसरला असावा,’’ असे क्रो यांनी सांगितले.
‘‘अश्विन हा भारतीय संघातील अव्वल क्रमांकाचा फिरकी गोलंदाज असूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकायची असेल तर भारताने त्या त्या विभागातील अव्वल व अनुभवी खेळाडूंनाच प्राधान्य देण्याची गरज आहे,’’ असेही क्रो यांनी सांगितले.