तामिळनाडूत सध्या जलीकट्टूवरून सुरू असलेल्या गदारोळाचा भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यालाही फटका बसला. जलीकट्टू खेळावर सुप्रीम कोर्टाने घातलेल्या बंदीच्या विरोधात तामिळनाडूत सध्या ठिकठिकाणी निदर्शने सुरू आहेत. जनतेच्या इच्छेमुळे सरकारने अध्यादेश काढला आणि हा खेळ खेळण्यात यावा यासाठी परवानगी दिली. गेल्या आठवड्याभरापासून तामिळनाडूत विविध ठिकाणी जलीकट्टूच्या समर्थनार्थ जनआक्रोश पाहायला मिळत आहे. जनआंदोलनामुळे काही ठिकाणी पोलिसांना लाठीमार करावा लागल्याचेही समोर आले. तामिळनाडूत सुरू असलेल्या या आंदोलनामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असताना आर.अश्विननेही या प्रकरणावरील आपले भय व्यक्त केले.

वाचा: जलिकट्टू केवळ निमित्त, हा सामान्यजनांचा असंतोष!

इंग्लंडविरुद्धच्या कोलकाता वनडेनंतर आर. अश्विन चेन्नई विमानतळावर परतला. अश्विनला तामिळनाडूत सुरू असलेल्या जलीकट्टूच्या वादाची कल्पना असल्याने त्याने आपल्या घरी जाताना खासगी कारमधून प्रवास करण्याऐवजी मेट्रोमधून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईमध्ये सोमवारी जलीकट्टूच्या समर्थनार्थ रास्तारोको आंदोलन सुरू होते. त्यामुळे सर्व रस्ते ट्राफीकमुळे जाम झाले होते. त्यामुळे अनेकांनी मेट्रोने प्रवास करण्याचा मार्ग अवलंबला. त्यामुळे अश्विननेही ट्राफीकच्या समस्येत अडकून राहण्यापेक्षा मेट्रोने घरापर्यंतचा प्रवास करणे योग्य समजले आणि तो एका सामान्य नागरिकाप्रमाणे तिकीट काढून मेट्रोने आपल्या राहत्या घरी पोहोचला. अश्विनने मेट्रोमध्ये शिरताच त्याच्याभोवती चाहत्यांचा गराडा झाला. अश्विनने देखील कोणतीही दिक्कत न बाळगता आपल्या चाहत्यांना प्रतिसाद दिला. चाहत्यांच्या सेल्फी आणि ऑटोग्राफच्या मागण्या देखील अश्विनने पूर्ण केल्या. अश्विनने आपल्या ट्विटर हॅण्डलवर याबद्दलची माहिती दिली. सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व आज मला कळले. मला घरी सुरक्षित पोहोचविल्या बद्दल पोलिसांचे खूप खूप आभार, असे ट्विट अश्विनने केले. याआधी अश्विनने जलीकट्टूच्या समर्थनार्थ भूमिका घेत काही दिवसांपूर्वी ट्विट केले होते. जल्लीकट्टू या पारंपारिक खेळावरील बंदी अयोग्य असल्याचे अश्विनने म्हटले होते.

भारतीय संघ आता इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी सज्ज झाला असून या मालिकेसाठी अश्विन आणि जडेजा या फिरकीजोडी आराम देण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत अश्विन आपल्या कुटुंबियांसोबत वेळ व्यतित करणार आहे. अश्विन आणि जडेजाच्या जागी संघात अमित मिश्रा आणि परवेज रसूल यांना संधी देण्यात आली आहे.