बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताने आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवलं आहे. ३-१ अशा फरकाने सामन्यात विजय मिळवत भारताने अ गटात आपलं पहिलं स्थान कायम राखलं. भारताकडून १७ व्या मिनीटाला चिंगलीन सानाने गोल झळकावत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर भारताने सामन्यात मागे वळून पाहिलंच नाही, संपूर्ण खेळावर आपलं वर्चस्व कायम राखत भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभवाचा धक्का दिला.

भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना म्हणला की, प्रत्येक खेळाडूवर दडपण हे असतंच. मात्र भारताच्या खेळाडूंनी हे दडपण झुगारुन देत अतिशय सफाईदार खेळ केला. विशेषकरुन मधल्या आणि आघाडीच्या फळीतलं समन्वय हे आजच्या भारतीय संघाच्या विजयाचं प्रमुख कारणं ठरली. चिंगलीन सानाने भारताकडून पहिला गोल झळकावल्यानंतर पाकिस्तानची बचावफळी सावध झाली. भारताच्या आघाडीच्या फळीतल्या खेळाडूंनी रचलेले हल्ले पाकिस्तानने मोठ्या खुबीने परतवून लावले. त्यामुळे पहिल्याच सत्रात पाकिस्तानवर मोठी आघाडी घेण्याचं भारताचं स्वप्न भंगलं, मध्यांतरापर्यंत भारताकडे १-० अशी नाममात्र आघाडी होती.

मात्र मध्यांतरानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंवरचा दबाव जाणवायला लागला. भारतीय खेळाडूंना चुकीच्या पद्धतीने ‘टॅकल’ केल्याप्रकरणी पंचांनी दोन खेळाडूंना ‘येलो कार्ड’ दाखवत ५ मिनीटासाठी संघाबाहेर केलं. त्यात मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचाही पाकिस्तानला फायदा उचलता आला नाही. अखेर भारताकडून ४४ व्या मिनीटाला रमणदीपने गोलपोस्टवरची ही कोंडी फोडली. भारतीय खेळाडूने केलेल्या लाँग पासवर रमणदीपने बॉलला गोलपोस्टची दिशा दाखवत भारताची आघाडी २-० अशी भक्कम केली. यानंतर अवघ्या एका मिनीटातच भारताचा तरुण ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंहने पेनल्टी कॉर्नवर गोल करत भारताचा तिसरा गोल झळकावला.

भारतीय संघाच्या या आक्रमणापुढे पाकिस्ताचा संघ पुरता भांबावून गेलेला दिसत होता. मात्र ४८ व्या मिनीटाला पाकिस्तानच्या अली शानने सुरेख मैदानी गोल झळकावत भारताची आघाडी एका गोलने कमी केली. यानंतर पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नरवर गोल झळकावण्याची संधी आली होती, मात्र महाराष्ट्राचा तरुण गोलकिपर आकाश चिकटेने सुरेख बचाव करत पाकिस्तानचं आक्रमण परतवून लावलं. यानंतर पाकिस्तानने भारतीय गोलपोस्टवर आक्रमण करत सामन्यात बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रत्येक वेळी भारतीय बचावपटूंनी पाकिस्तानी खेळाडूंचे प्रयत्न हाणून पाडले. यानंतर अखेरच्या दोन मिनीटांमध्ये भारताला पेनल्टी कॉर्नवर गोल करण्याची संधी चालून आली होती, मात्र भारतीय खेळाडू यात अपयशी ठरले.