देशभरात सुरु असलेला दिवाळीचा सण आणि भाऊबीजेच्या शुभ मुहुर्तावर भारताने आशिया चषक हॉकी स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर पुन्हा एकदा मात केली. साखळी सामन्यात पाकिस्तानला ३-१ असं हरवल्यानंतर सर्वोत्तम ४ गटाच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ४-० अशी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. २२ ऑक्टोबरला म्हणजेच रविवारी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. मलेशिया विरुद्ध कोरिया यांच्यातील विजेत्याशी भारतीय संघाला उद्या खेळावं लागणार आहे.

साखळी सामन्याच्या तुलनेत दोन्ही संघांनी पहिल्या सत्रात सावध पवित्रा आजमवलेला पहायला मिळाला. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांकडून प्रतिस्पर्धी संघाच्या गोलवर आक्रमण करण्याचे प्रयत्न झाले, मात्र दोन्ही संघांच्या गोलकिपरने हे प्रयत्न हाणून पाडले. भारताच्या तुलनेत पाकिस्तानच्या खेळाडूंनी पहिल्या सत्रात जास्त आक्रमक खेळ केला. पाकिस्तानला पहिल्या सत्रात गोल करण्यासाठी दोन संधी आल्या होत्या, मात्र त्याचा फायदा उचलणं पाकिस्तानला जमलं नाही. भारतीय संघानेही पहिल्या सत्रात चांगलं आक्रमण करत पाकिस्तानवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र गोलपोस्टवरची ही कोंडी फोडण्यात त्यांना अपयश आलं.

या सामन्याचं दुसरं सत्र हे पहिल्या सत्राची पुनरावृत्ती करणारं ठरलं. अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी विजय मिळवणं आवश्यक असलेल्या पाकिस्तान संघाने पुन्हा आक्रमक खेळ करत भारतीय संघावर आक्रमण करायला सुरुवात केली. मात्र भारताची बचावफळी भेदणं त्यांना काही केल्या जमलं नाही. दुसऱ्या बाजून भारतानेही सामन्यात आपला पहिला गोल झळकावत आघाडी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय खेळाडूही गोल करण्यात अपयशी ठरले. पेनल्टी कॉर्नवर गोल करण्याची संधी चालून आलेली असताना ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंहने मारलेला चेंडू गोलपोस्टला लागल्याने भारताचा सामन्यातला पहिला गोल होता होता राहिला. त्यामुळे मध्यांतरापर्यंत सामन्यातली गोलकोंडी काही केल्या फुटू शकली नाही.

तिसऱ्या सत्रातील बहुतांश वेळ दोन्ही संघांनी बचावात्मक पवित्रा अवलंबल्यामुळे सामन्यात एकही गोल झालेला पहायला मिळाला नाही. अखेर भारताकडून ३९ व्या मिनीटाला सतबीर सिंहच्या पासवर गुरजंत सिंहने सुरेख पद्धतीने बॉल गोलपोस्टमध्ये ढकलून गोलपोस्टवरची कोंडी फोडली. यानंतर सामन्यात भारताने पाकिस्तानला बॅकफूटला ढकलण्यास सुरुवात केली. पहिल्या गोलनंतर भारताला पेनल्टी कॉर्नवर गोल करण्याची आणखी एक संधी चालून आली होती, मात्र बदली ड्रॅगफ्लिकर चिंगलीन सानाला या संधीचं सोनं करता आलं नाही. तिसऱ्या सत्रात भारताच्या आघाडीच्या फळीने काही सुरेख चाली रचत, पाकिस्तानी गोलकिपरवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात भारतीय खेळाडूंना यश आलं नाही.

तिसऱ्या सत्रात गेलेल्या गोलच्या आधारावर भारतीय खेळाडूंनी सामन्यातील अखेरच्या सत्रात आक्रमक खेळाला सुरुवात केली. मात्र अनपेक्षितपणे पाकिस्तानी खेळाडूंनी भारताच्या आक्रमणाचा चांगला सामना केला. भारताच्या आघाडीतल्या फळीने केलेले हल्ले पाकिस्तानी बचावफळीने रोखून धरले. चौथ्या सत्रात पेनल्टी कॉर्नवर भारतीय संघाचं आक्रमण पाकिस्तानी गोलकिपर अमजल अलीने मोठ्या शिताफीने परतवून लावलं. मात्र भारतीय खेळाडू सुमीतला पेनल्टी क्षेत्रात धक्का दिल्यामुळे पंचांनी भारताला पेनल्टी कॉर्नर बहाल केला, आणि या संधीचा फायदा उचलत ५१ व्या मिनीटाला भारताचा हक्काचा ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंहने भारताचा दुसरा गोल झळकावला. यावेळी अमजल अलीने हरमनप्रीतचा चेंडु डाव्या बाजूने येईल असा अंदाज बांधला होता, मात्र मोक्याच्या क्षणी आपल्या फटक्याची दिशा बदलत हरमनप्रीतने अमदल अलीच्या उजव्या बाजूने बॉल गोलपोस्टमध्ये ढकलला. या धक्क्यातून पाकिस्तान सावरतो न सावरतो तोच ललित उपाध्यायने ५२ व्या मिनीटाला भारतासाठी तिसरा गोल झळकावत सामन्यात पाकिस्तानला बॅकफूटवर ढकललं. त्यानंतर ५७ व्या मिनीटाला आकाशदीप सिंहच्या पासवर गुरजंत सिंहने मारलेला जोरदार फटका अमदल अलीला अडवणं शक्य झालं नाही, भारताचा या सामन्यातला चौथा गोल ठरला.