जपानविरुद्ध विजय आणि दक्षिण कोरियाविरुद्ध बरोबरीनंतर भारतीय संघासमोर आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत पारंपरिक पाकिस्तानचे कडवे आव्हान आहे. जम्मू आणि काश्मीरमधील उरी येथे भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १९ भारतीय जवानांना प्राण गमवावे लागले होते. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पुन्हा एकदा दुरावले आहेत. विविध स्तरातील आयात-निर्यात तसेच आगमन निर्गमनावर परिणाम झाला आहे. मात्र तटस्थ ठिकाणी स्वतंत्र स्पर्धा असल्याने या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होत आहे.

गतविजेत्या पाकिस्तान संघाला यंदा सलामीच्या लढतीत यजमान मलेशियाविरुद्ध अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. २०११ मध्ये पहिल्यावहिल्या आशियाई चॅम्पियन्स चषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानला नमवतच जेतेपदाची कमाई केली होती. २०१३ मध्ये पाकिस्तानने जपानचा पराभव करत जेतेपद पटकावले. या स्पर्धेसाठी भारताने २१ वर्षांखालील संघ पाठवला होता आणि या संघाला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

२०१४ मध्ये इन्चॉन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पाकिस्तानला नमवले होते. या पराभवामुळे पाकिस्तान संघ रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरू शकला नाही. आशियाई तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी करणाऱ्या पाकिस्तान संघासाठी गेले काही महिने कठीण कालखंड आहे.

स्पर्धेतील या बहुचर्चित लढतीसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. ‘अन्य लढतींप्रमाणेच हा एक सामना आहे. मायदेशात लढतीसंदर्भात वातावरण निर्मिती होत आहे.  भावनिक होण्यापेक्षा शांत राहून संयमी खेळ करणे आवश्यक आहे. एकाग्र राहण्यासाठी खेळाडूंना समाजमाध्यमांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे’, असे कर्णधार पी. आर. श्रीजेशने सांगितले. भारताविरुद्धचा सामना भावनिक क्षण असतो परंतु आम्ही आक्रमक खेळू असे पाकिस्तानचे प्रशिक्षक ख्वाजा जुनैद यांनी सांगितले.

भारत-कोरिया लढत बरोबरीत

जपानविरुद्धच्या दणदणीत विजयानंतर भारताला दक्षिण कोरियाविरुद्ध बरोबरीत समाधान मानावे लागले. क्रमवारीत भारताच्या मागे असलेल्या कोरियाने सातत्याने भारताच्या बचावाला भेदत आक्रमण केले. १०व्या मिनिटाला कोरियाच्या जेआँग चुनकोने मध्यरक्षकाकडून मिळालेल्या पासच्या बळावर गोल करत कोरियाचे खाते उघडले. प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय आघाडीपटूंनी जोरदार आक्रमण केले मात्र गोल करण्यात त्यांना अपयश आले. ३२व्या मिनिटाला निकीनच्या पासवर ललितच्या गोलसह भारताने बरोबरी केली. उर्वरित वेळेत कर्णधार आणि गोलरक्षक पी.आर. श्रीजेशने कोरियाच्या आक्रमणाला रोखले. मात्र भारताच्या आघाडीपटूंना गोल करण्यात अपयश आल्याने भारताला बरोबरीत समाधान मानावे लागले.